Advertisement

मुंबईकरांनो, नवी मुंबईला जाण्यासाठी जुना खाडीपूल वापरा, नव्या पुलाचा एक मार्ग २० दिवस बंद


मुंबईकरांनो, नवी मुंबईला जाण्यासाठी जुना खाडीपूल वापरा, नव्या पुलाचा एक मार्ग २० दिवस बंद
SHARES

नवी मुंबईतील नव्या वाशी खाडीपुलावरील एक मार्ग मंगळवार, २३ जानेवारीपासून दुरूस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत या मार्गाने येणाऱ्या वाहनचालकांना जुन्या खाडीपुलाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


कारण काय?

नव्या खाडीपुलावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून परिणामी पुलाच्या लोखंडी ज्वाईंटसची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. हा धोका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागा (पीडब्ल्यूडी)ने या पुलाच्या, लोखंडी ज्वाईंटसचं काम हाती घेतलं आहे. या कामाला मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे मंगळवार, २३ जानेवारीपासून पुढचे २० दिवस अर्थात १२ फेब्रुवारीपर्यंत पुलावरील एक मार्ग पूर्णत: बंद राहणार असल्याचं वाहतूक विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.


केवळ हलक्या वाहनांनाच

मुंबईहून नवी मुंबई-पुण्याला जाण्यासाठीचा मार्ग बंद असणार असल्यानं हलक्या वाहनांना आता जुन्या खाडीपुलाचाच वापर करावा लागणार आहे. तर जड वाहनांना आता १२ फेब्रुवारीपासून एेरोली पुलाचाच वापर करावा लागणार आहे.


वाहतूककोंडीची शक्यता

नव्या वाशी खाडीपुलावरून सर्वच प्रकारच्या वाहनांची ये-जा होते. तर जुन्या खाडी पुलावर हलक्या वाहनांनाच प्रवेश आहे. अशावेळी आता नव्या खाडीपुलाचा नवी मुंबई-पुण्याला जाण्याचा मार्ग बंद राहणार असल्यानं जड वाहनांची मोठी पंचाईत होणार आहे. त्यांना एेरोली पुलाचा वापर करावा लागणार आहे. तर जुन्या खाडीपुलावरून हलक्या वाहनांची पूर्णत: वाहतूक होणार असल्यानं २३ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत जुन्या खाडीपुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.


अडचणीचा प्रवास

एेरोली पुलावरून जड वाहतूक वळवण्यात आल्याने एेरोली पुलावरही वाहतूककोंडी दिसून येणार आहे. त्यामुळे पुढचे २० दिवस मुंबई-पुणे रस्ते प्रवास वाहनचालकांसाठी थोडा अडचणींचाच ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान पुण्यावरून नवी मुंबई-मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी नव्या खाडी पुलावरील एक मार्ग उलट्या दिशेनं अर्थात उत्तर मार्गिके (मुंबई-पनवेल) वरून सुरू राहणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा