रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद

  Mumbai
  रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद
  मुंबई  -  

  राज्यभरात रिक्षा-टॅक्सीचे भाडे किती असावे, त्यात किती वाढ करण्यात यावी हे ठरविण्यासाठी राज्य शासनाने खटुआ समिती स्थापन केली असून समितीने सर्वसामान्यांची याबाबतची मते जाणून घेण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सर्वेक्षण अर्ज उपलब्ध केले आहेत. बहुसंख्य मुंबईकरांना अशा कुठल्याही सर्वेक्षण अर्जाची कल्पना नसल्याने या सर्वेक्षणाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मागील 15 दिवसांत केवळ 1 हजार 50 नागरिकांनी आपली मते परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवली आहेत. 15 मेपर्यंत ही मते नागरिकांना नोंदवायची होती. मात्र नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहता परिवहन विभागाने सूचना व हकरती नोंदवण्याची शेवटची तारीख वाढवून ती 31 मे केली आहे.

  टॅक्सी चालकांनी नाकारली भाडेवाढ -
  खटुआ समितीने देखील आपला अहवाल सादर करण्याची मुदत जून अखेरपर्यंत वाढवली आहे. या समितीने रिक्षा टॅक्सी चालक संघटनांशीही चर्चा केली आहे. या चर्चेत टॅक्सी चालक संघटनांनी आधीच ओला-उबेरमुळे तोटा सहन करावा लागत असून आम्हाला दरवाढ नको अशी भूमिका घेतली आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सीचालकांनी दरवाढ केल्यास त्याचा अप्रत्यक्षपणे आेला- उबेरलाच फायदा होईल. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टॅक्सी चालक संघटनांनी भाववाढ नाकारल्याचे म्हटले जात आहे.

  काळया पिवळ्या टॅक्सीचे भाडे प्रति किलोमीटर 22 रुपये आहे. आम्हाला 22 रुपयांपेक्षा कमी व जास्त भाडेवाढ नको आहे. येत्या 1 जूनपासून काळी पिवळी टॅक्सी बुक करण्यासाठी मोबाइल अप्लिकेशन येत आहे. त्यावर टॅक्सी बुक केल्यास ग्राहकाला 30 रुपये प्रति किलोमीटर भाडे द्यावे लागेल.
  - ए. एल. क्वाड्रोस, जनरल सेक्रेटरी, मुंबई टॅक्सीमेन युनियन

  काळ्या पिवळ्या टॅक्सीची छुपी भाडेवाढ?
  टॅक्सी चालक संघटनांनी भाडेवाढ नाकारली असली, तरी मोबाइल अप्लिकेशनवर टॅक्सी बुक केल्यास त्यासाठी 30 रुपये भाड्याची अट ठेवण्यात आली आहे. ओला, उबेर गाडी बुक करताना कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारत नाही. काळ्या पिवळ्या टॅक्सीचे भाडे 22 रुपये असताना अॅपवर टॅक्सी बुक करण्यासाठी ग्राहकाला 8 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. ही एकप्रकारची छुपी भाडेवाढ ग्राहकांच्या माथी येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.