Advertisement

निधी मिळाला! उपनगरीय रेल्वेची कामे फास्ट ट्रॅकवर

मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित अन् सुखकर व्हावा, म्हणून हा निधी तात्काळ वापरून विकासकामांना गती देण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिले.

निधी मिळाला! उपनगरीय रेल्वेची कामे फास्ट ट्रॅकवर
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पात मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांसाठी मोठी तरतूद केली. मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित अन् सुखकर व्हावा, म्हणून हा निधी तात्काळ वापरून विकासकामांना गती देण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार किती निधी वापरून कुठल्या कामांना सुरूवात करण्यात येईल, याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


अर्थसंकल्पात किती तरतूद?

अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या विकासकामांसाठी ४ हजार ४१९ कोटी, तर पश्चिम रेल्वेसाठी ५ हजार ८०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीपेक्षा ही तरतूद जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातही मुंबईकरांसाठी आवश्यक असलेल्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी)-३ ए अंतर्गत तब्बल ५४ हजार ७७७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.



निधी 'या' कामांसाठी होणार खर्च

  • २०१८-१९ या आर्थिक वर्षात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या स्थानकांत एकूण ४३ नवे पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • प्रवाशांच्या सोयीसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी लिफ्ट्स आणि एस्केलेटर इत्यादींची तरतूद करण्यात आली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण ३७२ लिफ्ट्सची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी १७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • ईएमयू, डेमू, मैमू तसंच राजधानी, शताब्दी आणि इतर प्रीमियम गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
  • रेल्वेची सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या १३८ स्थानकांमध्ये सीसीटिव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी ३०३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरपीएफअंतर्गत येणाऱ्या डॉग क्वॉड, क्लास रूम आणि विविध सुविधांसाठी ६९० कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.
  • पश्चिम रेल्वेच्या १५ उपनगरीय स्थानकांच्या पुनर्विकासासाठी ३०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
  • अंधेरी आणि विरार दरम्यान धीम्या मार्गावरील कॉरिडोरचं विस्तारकरण करुन त्यावर १५ डब्यांच्या ट्रेन्सची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी ५९ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • वांद्रे टर्मिनसमधील कोच देखभाल आणि दुरुस्ती विभागासाठी ३४ कोटी रुपयांची, डहाणू रोड स्थानकातील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी १७ कोटी ८९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर १०० सरकते जिने लावण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान धिम्या मार्गावर १५ डब्बा लोकल चालवण्यासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
  • शिवाय, पादचारी पूल आणि प्लॅटफॉर्म उंचीसाठी ५५० कोटी रु. लिफ्ट, सरकते जिने २७५ कोटी रु, नवीन ४३ पादचारी पूलांपैकी १९ पुलांना मंजूरी मिळाली आहे.


मध्य रेल्वेसाठी ४ हजार ४१९ कोटी रुपयांची तरतूद

  • मध्य रेल्वे मार्गावरील विविध कामांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४ हजार ४१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
  • प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी ४५० कोटी रुपये
  • उपनगरीय मार्गावरील २० स्थानकांचा पुर्नविकास करण्यासाठी ७०० कोटी रुपये
  • सीएसएमटीच्या मध्य रेल्वेच्या मुख्य बिल्डिंगचे रुपांतर रेल म्युझियममध्ये करण्यासाठी २५ कोटी रुपये
  • परळ कोचिंग कॉप्लेक्ससाठी १९३ कोटी रुपये
  • प्रवासी सुविधांसाठी १७२ कोटी रुपये
  • नवीन रेल्वे मार्गासाठी १३२२ कोटी
  • दुहेरीकरणासाठी १,२०६ कोटी
  • ट्रॅफिकसाठी २१८ कोटी
  • रोड ओव्हरब्रीज (आरओबी) साठी २७० कोटी
  • सिग्नल टेलिफोन यंत्रणेसाठी १३२ कोटी
  • ओएचई-ट्रॅक्शनच्या कामासाठी १२४ कोटी
  • मांटुगा येथील वर्कशॉपसाठी ४५६ कोटी
  • कर्मचारी सुविधांसाठी १२ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद

मध्य रेल्वे मार्गावर जी ३४ महत्वाची कामं करण्यात येणार आहे, त्यापैकी १७ कामांची नोटीस मंगळवारी रात्री उशिराच मध्य रेल्वेने जारी केल्या आहेत. या १७ कामांची एकूण किंमत ४१९ कोटी रुपये आहे.

मध्य रेल्वे मार्गाच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील २१ पादचारी पुलांना मान्यता देण्यात आलेली आहे.

मुंबईकरांसाठी आवश्यक असलेल्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी)-३ ए अंतर्गत तब्बल ५४ हजार ७७७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना तत्वता मंजुरी देण्यात आली आहे.

  • बोरीवली ते विरार दरम्यान ५ वी आणि ६ वी मार्गिका
  • नवीन उपनगरीय मार्ग विरार - वसई - पनवेल
  • चर्चगेटवर सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल) - विरार आणि सीएसएमटी - कल्याण आणि पनवेल विभाग
  • स्थानकांची सुधारणा
  • रोलिंग स्टॉकसाठी देखभाल सुविधा
  • रोलिंग स्टॉकची खरेदी
  • मध्य रेल्वेवरील इतर प्रमुख प्रकल्पांसह, वीज पुरवठा व्यवस्थेचे विस्तारीकरण



हेही वाचा-

मुंबईच्या 'लाईफलाईन'ला ५१ हजार कोटींची 'सलाईन'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा