पीयूसी नसेल तर सी-लिंकवर नो एन्ट्री

  Worli
  पीयूसी नसेल तर सी-लिंकवर नो एन्ट्री
  मुंबई  -  

  वांद्रे-वरळी सी-लिंकवरून कार ड्राईव्ह करण्याची मजा काही औरच. हौशी मुंबईकर संधी साधून या सी-लिंकची सैर केल्याशिवाय पुढे जातच नाही. मात्र आता 'प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र' अर्थात 'पीयूसी' नसल्यास तुम्हाला वांद्रे-वरळी सी-लिंकवरून वाहन घेऊन जाता येणार नाही. 

  वांद्रे-वरळी सी-लिंकवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने मागील काही वर्षांत येथील प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. प्रदूषणाचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी सर्व वाहन चालकांकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या नियमाकडे वाहनचालक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय (ताडदेव) जून महिन्यात ‘पीयूसी’ प्रमाणपत्र तपासणीसाठी विशेष मोहीम  राबवणार आहे. या मोहिमेंतर्गत ज्या वाहनांकडे ‘पीयूसी’ नसेल अशा वाहनांना वांद्रे-वरळी सी-लिंकवर प्रवेश नाकारण्यात येईल.

  वाहन प्रदूषण टाळण्यासाठी सर्व वाहनांना ‘पीयूसी’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र या नियमांची अमंलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. यामुळे 8 जून ते 30 जून दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘बीएस-4’ च्या वायूप्रदूषण मानकांची पूर्तता करणाऱ्या प्रमाणपत्राची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

  मुंबईमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालया (ताडदेव)ची तीन भरारी पथके आणि पीयूसी पथक यांच्या वतीने विशेष मोहीम महिनाभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय अशा वाहन चालकांना सी-लिंक प्रवेशही नाकारण्यात येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.