उद्योग राज्यमंत्र्यांची धारावीला भेट

 Dharavi
उद्योग राज्यमंत्र्यांची धारावीला भेट

'घर चलो' अभियानांतर्गत भाजप नेते आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटेपाटील यांनी धारावीकरांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, राज्यमंत्र्यांनी धारावीतल्या कुंभारवाड्यास भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुनर्विकासाच्या गर्तेत सापडलेल्या धारावीकरांच्या हक्काच्या घरांच्या मागणीबाबत स्थानिक रहिवाशांशी त्यांनी थेट संवाद साधला. या वेळी मुंबई जिल्हा दक्षिण मुंबई अध्यक्ष अनिल ठाकूर, भाजप जिल्हा महामंत्री राजेश शिरवाडकर, धारावी अध्यक्ष मणी बालन यांच्यासह धारावीतील अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या पंधरा वर्षांपासून धारावीचा विकास रखडला आहे. मागील सरकारने दिलेल्या सर्वे अहवालात 60 हजार झोपड्या दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही योजना रखडली. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार धारावीचा गुप्त सर्वे होणार आहे. घराच्या बदल्यात घरे देण्याची आमची योजना आहे. तसेच धारावी ही उद्योग नगरी असून येथील घराघरात अनेक लघुद्योग चालतात. त्यामुळे सर्वप्रथम धारावीतल्या 25 हजार एकरमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर बनवणार आहोत. लघुउद्योजकांचे पुनर्वसन त्या जागेत करणार आहोत. त्यामुळे लघु उद्योगाला चालना मिळेल आणि मालकराज, इन्स्पेक्टर राज संपुष्टात येईल. जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे राज्यमंत्री प्रवीण पोटेपाटील म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील अनेक विकासकामांचा पाढा त्यांनी वाचला. मात्र लघुउद्योग चालवणाऱ्या आस्थापनांच्या मालकाच्या पुनर्वसनाबाबत त्यांनी बोलण्याचे टाळले. या वेळी धारावीतील काही रहिवाशांनी दुमजली आणि तीन मजली घराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर 2000 पूर्वीच्या 100 टक्के लोकांना घरे देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

Loading Comments