Advertisement

ऑनलाईन कला प्रदर्शनाचं आयोजन, ५० कलाकारांना पुरस्कार जाहीर

२५ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान www.bombayartsociety.org संकेतस्थळावर ऑनलाईन कला प्रदर्शन

ऑनलाईन कला प्रदर्शनाचं आयोजन, ५० कलाकारांना पुरस्कार जाहीर
SHARES

गेल्या शतकभरापासून संपूर्ण भारतातील कलावंतांना व्यासपीठ देण्याचे मोलाचे काम करणाऱ्या 'बॉम्बे आर्ट सोसायटी'च्या १२९व्या 'ऑल इंडिया ॲन्युअल आर्ट एक्झिबिशन'ची दिमाखात सुरुवात झाली आहे. यावेळी 'बॉम्बे आर्ट सोसायटी'द्वारे देण्यात येणारे वार्षिक कला पुरस्कार भारतातील एकूण ५० कलाकारांना आणि त्यांच्या कलाकृतींना देण्यात आले. 

कोरोना महामारीमुळे यंदा या कला प्रदर्शनाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले आहे. 'बॉम्बे आर्ट सोसायटी'च्या वांद्रे इथल्या दालनात २५ मार्च २०२१ रोजी दुपारी या सोहळ्याचा प्रारंभ झाला. सोहळ्याचे मुख्य अतिथी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्हिडिओद्वारे सर्व पुरस्कार विजेत्यांना आणि कला प्रदर्शनच्या प्रारंभाला शुभेच्छा दिल्या.

२५ मार्च ते २५ एप्रिल २०२१ दरम्यान हे कला प्रदर्शन  www.bombayartsociety.org संकेतस्थळावर पाहता येईल.  

''बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक कला प्रदर्शन हे कलावंतांसाठी मानाचा विषय आहे. या व्यासपीठामुळे अनेक कलाकारांना देश-विदेशात कलाक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करता आली. सध्याची महामारीची परिस्थिती पाहता यंदाच्या कला प्रदर्शनाचे आयोजन ऑनलाईन करणे हे कौतुकास्पद आहे. यामुळे कलाकारांना निश्चित प्रोत्साहन मिळेल.'' असा आनंद सोहळ्याचे मुख्य अतिथी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

पेंटिंग, ग्राफिक, फोटोग्राफी, शिल्पकृती अशा एकूण ५०० कलाकृतींमधून निवडक ५० कलाकारांना आणि त्यांच्या कलाकृतींना यावेळी पुरस्कार देण्यात आले. यंदाचा राज्यपालांतर्फे देण्यात येणारा 'राज्यपाल पुरस्कार' हा कलाकार चंदन भंडारी यांना प्राप्त झाला असून गोल्ड मेडल देत त्यांचा सन्मान करण्यात आला.

तर 'बॉम्बे आर्ट सोसायटी'द्वारे देण्यात येणारे 'सिल्व्हर मेडल' चित्रनजन मोहराणा आणि 'ब्राँझ मेडल' राबी गुप्ता यांना देण्यात आले.

सर्वोत्तम पेंटिंगसाठी देण्यात येणारा 'द ललित कला अकादमी' पुरस्कार बापू बाविस्कर यांना प्रदान करण्यात आला. व्यावसायिक आणि विद्यार्थी श्रेणीतील ५० विजेत्या पुरस्कारांसाठी या सोहळ्यात एकूण ४ लाख ५० हजारहून अधिक रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

''ऑनलाईन पद्धतीमुळे भारतातील तसेच विदेशात राहणाऱ्या भारतीय कलाकारांच्या प्रवेशिका आल्या. पेंटिंग, शिल्पकृती, ग्राफिक, फोटोग्राफी अशा विविध श्रेणी अंतर्गत १,५००हून अधिक कलाकारांच्या ३,६००हून अधिक प्रवेशिका आल्या. परीक्षकांनी निवडलेल्या ५०० कलाकृती ऑनलाईन प्रदर्शनात पाहता येतील'' असे 'बॉम्बे आर्ट सोसायटी'चे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले.

१८८८साली 'बॉम्बे आर्ट सोसायटी'ची स्थापना झाली. द बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक कला प्रदर्शन हा कलाकारांच्या अभिमानाचा विषय असतो. अनेक दिग्गज कलाकार या पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख करतात.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा