Advertisement

सावरकर स्मारकात गडकिल्ल्यांचे चित्रप्रदर्शन


सावरकर स्मारकात गडकिल्ल्यांचे चित्रप्रदर्शन
SHARES

दादर - अतुलनीय साहस, पराक्रम आणि वीरता यांचा साक्षात्कार आणि शिवशाहीचे सुवर्ण क्षण नजरेपुढे आणणारे आणि इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते.

श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते आणि इतिहास अभ्यासक आप्पा परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी गडकिल्ल्यांच्या उभारणीसाठी उपयोगात आणलेले वैविध्यपूर्ण पाषाणांचे प्रदर्शनही इतिहासप्रेमींना अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्रातली गड-दुर्गांची ओळख व्हावी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्याची प्रचिती सर्वांना यावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून आपल्या इतिहासाविषयी अभिमान तसेच राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येकामध्ये अधिकाधिक वाढीस लागेल, असा विश्वास स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या वेळी व्यक्त केला. सह्याद्री पर्वताच्या रांगेत विसावलेले तसेच महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक परिचित व अपरिचित अशा गडकिल्ल्यांची ओळख या प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे.

हे प्रदर्शन 2 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. रविवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार भरतशेठ गोगावले आणि सदा सरवणकर यांच्या उपस्थितीत समारोप व गडकिल्ले छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर, अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा