'ठाकरे'ची वाट कुणीही अडवू शकत नाही- संजय राऊत

बाळासाहेबांना सेन्साॅर कधीच नव्हता. इतरांच्या बाबतीत मला माहीत नाही. बाळासाहेबांची भाषणं असतील, लिखाण असेल, व्यंगचित्र असतील यापैकी काहीही कधीही सेन्साॅरच्या कैचीत अडकलं नाही. त्यामुळे हा चित्रपटसुद्धा अडकणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करीत सेन्साॅरसुद्धा आमचा प्रचारच करत असल्याचं राऊत म्हणाले.

'ठाकरे'ची वाट कुणीही अडवू शकत नाही- संजय राऊत
SHARES

‘ठाकरे’ चित्रपटाची वाट कुणीही अडवू शकत नाही, मग ते सेन्साॅर बोर्ड का असेना, असे उद्गार खासदार व चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी काढले आहेत. मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना राऊत यांनी सेन्साॅरला आपल्या शैलीत सुनावलं.


ट्रेलर लाँच

वडाळा येथील कार्निव्हल आयमॅक्स मल्टिप्लेक्समध्ये भगव्या वातावरणात, ढोल-ताशे, झांझ पथकांच्या संचालनात आणि शिवसैनिकांच्या नारेबाजीत मोठया दिमाखात ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा झाला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, दिग्दर्शक अभिजीत पानसे, व्हायकाॅम १८ चे अजीत अंधारे, निखील साने आदी मान्यवर उपस्थित होते.


सेन्साॅरकडून चित्रपटाचा प्रसार

‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही शब्द म्युट करण्याचे आदेश सेन्साॅरने दिल्याबाबत राऊत यांनी मिश्किल शब्दांत चिमटा काढला. ते म्हणाले की, सेन्साॅरची भूमिका चांगली आहे. यापुढेही ती कायम ठेवा. बाळासाहेबांना सेन्साॅर कधीच नव्हता. इतरांच्या बाबतीत मला माहीत नाही. बाळासाहेबांची भाषणं असतील, लिखाण असेल, व्यंगचित्र असतील यापैकी काहीही कधीही सेन्साॅरच्या कैचीत अडकलं नाही. त्यामुळे हा चित्रपटसुद्धा अडकणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करीत सेन्साॅरसुद्धा आमचा प्रचारच करत असल्याचं राऊत म्हणाले. ‘ठाकरे’समोर कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला, तरी काळजी करण्याची गरज नसल्याचंही राऊत म्हणाले.


मराठी माणूस पंतप्रधान होणार

मराठी माणूस भारताचा पंतप्रधान बनायला हवा या बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुखातील संवादाबाबत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणूस भारताचा पंतप्रधान बनायला हवा ही बाळासाहेबांची इच्छा होती. मराठी माणसात ती ताकद आहे. एक ना एक दिवस अस्सल मराठी माणूस, जो शिवसेना प्रमुखांचे विचार अंमलात आणेल, तो या देशाचा पंतप्रधान नक्कीच बनेल, असं मत ठाकरे यांनी व्यक्त केलं.


मोठी जबाबदारी

बाळासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीनने यावेळी बोलताना सांगितलं की, ''बाळासाहेबांची भूमिका आपण साकारतो आहोत यावर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. त्या गेटअपमध्ये जेव्हा मी टिमच्या समोर आलो, तेव्हा त्यांची रिअक्शन पाहून आपल्यावरील जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली. जस जसं शूटिंग जवळ आलं, तस तसा मी थोडा नर्व्हसही झालो होतो. त्यासाठी मग दिवस रात्र मी बाळासाहेबांच्या व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या. राऊत साहेबांनी त्यांच्या लहानसहान गोष्टी सांगितल्या. शूट सुरू झालं तेव्हा पानसेंनी खूप विश्वासाने माझ्याकडून बाळासाहेब साकारून घेतले'' असं नवाजुद्दीन यांनी अतिशय नम्रपणे सांगितलं.

बाळासाहेबांच्या भाषणातील काही घोषवाक्य आजही सर्वांना तोंडपाठ असल्याचं मत या सोहळ्याचं सूत्रसंचालन करणारे गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केलं. माँ साहेबांची भूमिका साकारण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचं अमृता रावने म्हटलं.हेही वाचा-

ठाकरे' जुमानणार का सेन्सॅारचा आदेश?

सिंबा'च्या मागे ११ मराठमोळ्या कलाकारांची फौजसंबंधित विषय