Advertisement

‘जिनीयस’ दिग्दर्शकाचं कमबॅक!

‘जिनीयस’ या हिंदी सिनेमामुळे अनिल शर्मा पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आले आहेत. शर्मांसाठी हा सिनेमा खूप महत्वाचा मानला जात आहे. जवळजवळ ५ वर्षांनी पुनरागमन करणारे शर्मा या सिनेमाद्वारे मुलगा उत्कर्षला 'इंट्रोड्युस' करत आहेत.

‘जिनीयस’ दिग्दर्शकाचं कमबॅक!
SHARES

लेखक-दिग्दर्शक-निर्माते अनिल शर्मा यांचं नाव घेताच ‘हुकूमत’, ‘ऐलान-ए-जंग’, ‘फरिश्ते’, ‘तहलका’, ‘गदर: एक प्रेमकथा’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’, ‘अपने’ या गाजलेल्या सिनेमांची नावं आपोआप डोळ्यांसमोर येतात. आता ‘जिनीयस’ या हिंदी सिनेमामुळे अनिल शर्मा पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आले आहेत. शर्मांसाठी हा सिनेमा खूप महत्वाचा मानला जात आहे. जवळजवळ ५ वर्षांनी पुनरागमन करणारे शर्मा या सिनेमाद्वारे मुलगा उत्कर्षला 'इंट्रोड्युस' करत आहेत. उत्कर्ष तोच मुलगा ज्याने ‘गदर’ या सिनेमात सनी देओल आणि अमिषा पटेलच्या मुलाची भूमिका साकारली होती.

हिंदी सिनेसृष्टीत ‘जिनीयस’ दिग्दर्शक अशी ओळख असणारे अनिल शर्मा यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्ल्युझीव्ह बातचीत करताना ‘जिनीयस’ सिनेमा तसंच मुलगा उत्कर्षविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.



माझं स्वप्न होतंच

आपल्या मुलाने आपल्यापेक्षाही जास्त नावलौकिक मिळवावा असं प्रत्येक पित्याला वाटत असतं. त्याप्रमाणे उत्कर्षने स्वत: च्या पायावर उभं राहावं, इंडस्ट्रीत स्वत: ला सिद्ध करावं असं मलाही वाटणं साहाजिक आहे. ‘जिनीयस’ची कथा माझ्या मनात होतीच. या कथेसाठी नवीन चेहऱ्याची गरज होती. या कथेवर सिनेमा करायचा ठरला तोपर्यंत उत्कर्ष यूएसहून परतलेला होता. त्यामुळे त्यालाच मुख्य भूमिकेसाठी निवडलं.


अपघाताने अभिनयाकडे

खरं तर उत्कर्ष हा अपघातानेच अभिनयाकडे वळला. ‘गदर’ सिनेमासाठी आम्हाला एक लहान मुलगा हवा होता. आपल्याच सिनेमात मुलाला प्रमोट करत आहे, असं लोकं म्हणतील म्हणून उत्कर्षला मला ‘गदर’मध्ये घ्यायचं नव्हतं, पण आमिषा पटेलने खूपच फोर्स केला. ती ऐकायलाच तयार नव्हती. अशा प्रकारे ‘गदर’च्या निमित्ताने उत्कर्षने बालवायातच कॅमेरा फेस केला.



उत्कर्षचा उत्कर्ष

‘गदर: एक प्रेमकथा’ या सिनेमामध्ये उत्कर्षने काम केलं, तेव्हा तो केजीमध्ये होता. त्यानंतर त्याला बऱ्याच सिनेमांच्या आॅफर्स आल्या, पण आम्ही त्या स्वीकारल्या नाहीत. त्यावेळी उत्कर्षलाही अभ्यासावर 'फोकस' करायचा होता. यूएसहून फिल्म डिग्री घेऊन आल्यानंतर तो खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून सज्ज झाला.


ही प्रेमाची लढाई

‘जिनीयस’ हा सिनेमा म्हणजे बुद्धीच्या बळावर एका जिनीयसने जिंकलेली प्रेमाची लढाई आहे. उत्कर्षने या सिनेमासाठी खूप कष्ट घेतले आहेत. अभिनयाच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने काम करत त्याने या सिनेमातील नायक साकारला आहे. प्रेक्षकांनाही तो नक्कीच आवडेल.



नवाजुद्दीनशी टक्कर

आज हिंदी सिनेसृष्टीत नवाजुद्दीन सिद्दीकी हा अभिनयातील हुकूमी एक्का मानला जातो. पदार्पणाच्या सिनेमातच उत्कर्षसमोर नवाजुद्दीनसारख्या तगड्या कलाकाराचं आव्हान होतं. सिनेमात दोघांची जुगलबंदी झकास जमली आहे. नवाजुद्दीनचं एक नवं रूप या सिनेमात पाहायला मिळेल.


दिग्गजांनी केलं कौतुक

‘जिनीयस’चे प्रोमोज पाहून दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी उत्कर्ष आणि सिनेमाचंही ट्विटरवर कौतुक केलं असून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय धरमजी यांनीही सिनेमाचे प्रोमोज आवडल्याचं म्हणत ‘जिनीयस’चा प्रोमो शेअर केला आहे. सनी देओलने उत्कर्षचा उल्लेख ‘गदर’मधील जीते या नावाने करत ‘जिनीयस’मधील ‘तेरा फितूर...’ हे गाणं शेअर केलं आहे.



गाणी लोकप्रिय

कथानकाच्या जोडीला संगीतप्रेमींच्या ओठांवर सहज रुळणाऱ्या सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न या सिनेमातही केला आहे. ‘तेरा फितूर...’ हे अरिजीत सिंगच्या आवाजातील गाणं आधीच लोकप्रिय झालं आहे. ‘दिल मेरे ना सुने...’ हे अतिफ असलमच्या आवाजातील गाणंही सुरेख आहे. याशिवाय होळीचं गाणं लवकरच लाँच करणार आहोत. हिमेश रेशमियाने दिलेलं संगीत रसिकांना खूप आवडत आहे.



हेही वाचा-

‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस

झोप उडवणार गिरीश जोशींचा ‘टेक केअर गुड नाइट’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा