Advertisement

'कारगिल गर्ल' बनली जान्हवी

श्रीदेवी-बोनी कपूर यांची कन्या जान्हवी कपूर पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'धडक' गर्ल बनलेली जान्हवी आता 'कारगिल गर्ल' बनून आली आहे.

'कारगिल गर्ल' बनली जान्हवी
SHARES

श्रीदेवी-बोनी कपूर यांची कन्या जान्हवी कपूर पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'धडक' गर्ल बनलेली जान्हवी आता 'कारगिल गर्ल' बनून आली आहे.


कारगिल गर्लच्या रूपात

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' या गाजलेल्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' या चित्रपटाद्वारे जान्हवी कपूर हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं परीक्षकांनी तितकंसं कौतुक केलं नाही. तरीही स्टारकिड असल्यानं तिचा पुढचा प्रवास तितकासा खडतर ठरला नाही. 'धडक' प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या दरवाजावर नवनवीन सिनेमांच्या आॅफर्स धडकू लागल्या होत्या. त्यापैकीच एका चित्रपटात जान्हवी कारगिल गर्लच्या रूपात झळकणार आहे.


गुंजन सक्सेना

'लडकीयां पायलट नहीं बनती' हे वाक्य ज्या तरुणीनं खोडून काढलं तिची आॅनस्क्रीन भूमिका जान्हवीनं साकारली आहे. त्यामुळं 'गुंजन सक्सेना' या चित्रपटात जान्हवी एका वेगळ्याच रूपात दिसणार आहे. गुंजन सक्सेना हे नाव सर्वांच्याच चांगलं परिचयाचं असेल. कारगिल गर्ल म्हणून जिची ओळख आहे त्या गुंजनची कहाणी 'गुंजन सक्सेना' या चित्रपटाच्या रूपात जगासमोर येणार आहे. जमिनीवर राहून आभाळात उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात अवतरणाऱ्या एका जिद्दी आणि धाडसी तरुणीची कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.


फर्स्ट लुक रिव्हील

'गुंजन सक्सेना'मधील जान्हवीचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या 'गुंजन सक्सेना'च्या तीन पोस्टर्सपैकी एका पोस्टरमध्ये अल्लड वयात हाती कागदी विमान उडवणारी जान्हवी दिसते, तर दुसऱ्या पोस्टरमध्ये पायलटच्या रूपात खरंखुरं लढाऊ विमान उडवण्यासाठी सज्ज झालेल्या जान्हवीला प्रोत्साहित करताना तिचे सहकारी दिसतात. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती झी स्टुडिओज आणि धर्मा प्रोडक्शन यांची आहे. पुढल्या वर्षी येणाऱ्या जागतिक महिला दिनानंतर १३ मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.


महिला अधिकाऱ्याची कथा

भारतीय हवाई दलातील युद्धावर जाणाऱ्या पहिल्या महिला अधिकाऱ्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 'द कारगिल गर्ल' अशी टॅगलाईनही 'गुंजन सक्सेना' या टायटलसोबत जोडण्यात आली आहे. शरण शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शरण यांनीच निखील मल्होत्रांच्या साथीनं या चित्रपटाचं लेखनही केलं आहे. अतिरीक्त संवादलेखन हुसैन दलाल यांनी केलं आहे. या चित्रपटातील भूमिका जान्हवीनं कशा प्रकारे साकारली आहे ते पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.



हेही वाचा -

अभिजीत कोसंबीनं गायली 'तेली गल्लीचा राजा'ची महती

पुन्हा शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा