Movie Review : घटनेतील कलमाआधारे जातीव्यवस्थेवर प्रहार

जाती-पातीच्या राजकारणावर प्रहार करत समाजात सर्वधर्मसमभाव नांदावा याची आठवण करून देणारं घटनेतील अतिशय महत्त्वाचं पंधरावं कलम म्हणजे 'अर्टिकल १५'.

  • Movie Review : घटनेतील कलमाआधारे जातीव्यवस्थेवर प्रहार
  • Movie Review : घटनेतील कलमाआधारे जातीव्यवस्थेवर प्रहार
  • Movie Review : घटनेतील कलमाआधारे जातीव्यवस्थेवर प्रहार
SHARE

'अर्टिकल १५' म्हणजे नेमकं काय? हे कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नसेल. जाती-पातीच्या राजकारणावर प्रहार करत समाजात सर्वधर्मसमभाव नांदावा याची आठवण करून देणारं घटनेतील अतिशय महत्त्वाचं पंधरावं कलम म्हणजे 'अर्टिकल १५'. ग्लोबल होऊ पाहणाऱ्या समाजाला नेमका आज याचाच विसर पडला आहे. त्यामुळं गाव-खेड्यांमध्ये आजही जात-पात, उच्च-नीच असा भेदभाव केला जातो. आजवर नेहमीच रिअॅलिस्टीक चित्रपट बनवणाऱ्या अनुभव सिन्हा यांनी 'आर्टिकल १५' मध्येही समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्य घटनांभोवती या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. उगाच फापटपसारा न मांडता किंवा मसालेपटांचे मसाले न वापरता आपल्याला जे दाखवायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करून त्या व्यतिरीक्त काहीही न दाखवण्याचा मोह सिन्हा यांनी टाळल्यानं हा चित्रपट बनवण्यामागील मूळ हेतू साध्य झाल्यासारखा वाटतो. या चित्रपटातील घटना जरी उत्तर प्रदेशातील एका गावातील असल्या तरी दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारच्या घटना घडत असतात. या घटना केवळ जाती-पातीच्या नावाखाली दडपल्या जातात आणि ज्यांच्यावर अन्याय होतो त्या निर्दोष व्यक्तींनाच सजा दिली जाते.

अप्पर पोलिस अधिक्षक आयान रंजनची (आयुष्मान खुराना) उत्तर प्रदेशमधील एका गावात बदली होते. तिथल्या भागावर जातीव्यवस्थेचा किती मोठा पगडा आहे याची जाणीव ड्युटी जॅाईन करण्यासाठी जात असतानाच आयानला होते. चळवळीतील कार्यकर्ती असलेल्या शहरातील पत्नी आदितीलाही (ईशा तलवार) तो मेसेजच्या माध्यमातून ही गोष्ट सांगतो. ड्युटी जॅाइन केल्यानंतर तिथे सुरू असलेल्या कारभाराची जाणीव त्याला होऊ लागते. दलित लोकं काहीतरी सांगण्यासाठी येत असतात, पण त्यांना थातूरमातूर उत्तरं देऊन हाकलून दिलं जात असल्याचं तो पाहतो. दुसऱ्या दिवशी दोन अल्पवयीन दलित मुलींचे मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडतात.

आयान जेव्हा त्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शोध सुरू करतो, तेव्हा तीन मुली बेपत्ता झाल्याचं समजतं. मजूरी करणाऱ्या या अल्पवयीन मुली दिवसाला ३ रुपये मजूरी वाढवून मागतात आणि त्यानंतर त्या बेपत्ता होतात असं जेव्हा आयानला समजतं, तेव्हा तो तिसऱ्या मुलीचा शोध घेण्यासाठी जीवाचं रान करतो. अशातच आयानचा जुना मित्र सत्येंद्रही (आकाश दाभाडे) गायब होतो. पोलिस अधिकारी ब्रम्हदत्त (मनोज पाहवा) या दलदलीत उतरू नका असं आयानला हात जोडून सांगतो, पण दलित तरुणी गौराकडून (सयानी गुप्ता)मिळालेली माहिती आयानला स्वस्थ बसू देत नसते. त्याच्यावर विविध प्रकारे दबाव आणला जातो, पण तो या प्रकरणाचा छडा लावतोच.

विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ जातीव्यवस्थेतील कारभारावर प्रकाश टाकण्यापुरता मर्यादित न राहता आयान आणि आदिती यांच्यातील संभाषणाच्या माध्यमातून त्यावर भाष्यही करतो. गाव खेड्यांमध्ये आजही कशाप्रकारे जातीयवादाची घडी जशीच्या तशी आहे. घटनेतील कलम १५शी त्यांना काहीही घेणं देणं नाही याची जाणीव करून देतो. केवळ तिथल्या लोकल पोलिस अधिकाऱ्यांची हतबलता दाखवत नाही, तर ते देखील संधी साधत अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असतात आणि राजकारणी, कंत्राटदार, महंत यांच्या आडून जातीव्यवस्थेचा झेंडा फडकवत ठेवतात याची जाणीव करून देतो. समाज हा सर्व घटकांनी बनलेला आहे. त्यातील एका घटकानं जर बंड केलं, तर समाजव्यवस्था कोलमडू शकते याचं उदाहरण सफाई कर्मचाऱ्यांच्या बहिष्काराच्या माध्यमातून अगदी मार्मिकपणे सादर करण्यात आलं आहे. स्वत:च्या अल्पवयीन बहिणीला आयानच्या घरी जेवण बनवण्यासाठी ठेवून तिला शिकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निहाल सिंगचं सत्य जेव्हा समोर येतं, तेव्हा आजही समाजात जातीपातीची मूळं किती खोलवर रुजली आहेत याची जाणीव होते.

सीमेपलीकडील घाण देशात येऊ नये यासाठी तिथे लढणारे जवान शहीद होतात तेव्हा त्यांचा सन्मान केला जातो, पण देश स्वच्छ ठेवण्यासाठी ड्रेनेजमध्ये उतरून आपल्याच देशवासीयांनी केलेली घाण साफ करताना गुदमरून मरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. का तर ते दलित आहेत. हा चित्रपट वास्तववादी असल्यानं संवाद, कलादिग्दर्शन, छायांकन, पार्श्वसंगीत या पातळ्यांवरही तशाच प्रकारची ट्रीटमेंट दिल्यानं एक रिअॅलिस्टीक चित्रपट पहायला मिळतो. या चित्रपटातही काही त्रुटी राहिल्यासारख्या वाटतात, पण कदाचित दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून त्या बरोबरही असतील. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष केलं तर 'मुल्क' नंतर सिन्हांनी दिग्दर्शित केलेला हा आणखी एक वास्तववादी चित्रपट जाती-पातीच्या राजकारणात अडकलेल्यांच्या डोळ्यांत प्रखर अंजन घालण्यासाठी पुरेसा असल्यासारखा वाटतो.

आयुष्मान खुरानाचा अभिनय कमालीचा आहे. प्रत्येक चित्रपटात तो वेगळा वाटतो. त्यामुळंच तो कोणत्याही व्यक्तिरेखेतच चपखल बसतो. दिल्लीहून उत्तर प्रदेशमध्ये आलेला, नवखा, कर्तव्यदक्ष, दबावाखाली न झुकता आपल्या मतांवर ठाम राहणारा, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा लढा बुद्धीच्या बळावर देणारा अप्पर पोलिस अधिक्षक त्यानं अगदी सहजपणं साकारला आहे. ईशा तलवारची भूमिका फार मोठी नसली तरी विचारवंतांना चित्रपटाचा विषय पटवून देणारी आहे. गौराची भूमिका साकारणाऱ्या सयानी गुप्तानं पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय केला आहे. मनोज पाहवा यांनी साकारलेला ब्रम्हदत्त खरं तर सरप्राईज पॅकेज आहे. तो नेमका असं का वागतो? याचं उत्तर चित्रपटाच्या अखेरच्या भागात मिळतं. कुमुद मिश्रा यांनी साकारलेला जाटव विचारपूर्वक असून, सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यावर स्वत:मध्ये बदल घडवणारा आहे.

आजवर बऱ्याच चित्रपटांनी जातीव्यवस्थेवर भाष्य केलं असलं तरी हा चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतो. हा केवळ जाती-पातीवर भाष्य करत नाही, तर कठोर प्रहारही करतो. जातीव्यवस्थेच्या दलदलीत अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी नवी उर्जा देणारा हा चित्रपट प्रत्येकानं पहायला हवा.

.........................................

हिंदी चित्रपट : अर्टिकल १५

निर्माता : अनुभव सिन्हा, झी स्टुडिओज

दिग्दर्शक : अनुभव सिन्हा

लेखन : गौरव सोलंकी, अनुभव सिन्हा

कलाकार : आयुष्मान खुराना, ईशा तलवार, सयानी गुप्ता, मनोज पाहवा, कुमूद मिश्रा, नस्सार, रोंजनी चक्रबर्ती, मोहम्मद झीशान अयूब, आशिष वर्मा, सुशील पांडेय, आकाश दाभाडे.हेही वाचा -

अगंबाई अरेच्चा! कोण आहेत हे?

शाहरुखचा मराठमोळा अंदाज पाहिला का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या