Advertisement

Movie Review : सत्य शोधार्थ रचलेलं रोमांचक सूडचक्र

हा सिनेमा 'दि इनव्हिझीबल गेस्ट' या स्पॅनिश सिनेमाचा हिंदी रिमेक असला, तरी रूपांतरण केल्याची जाणीव कुठेही होत नाही. हेच या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानावं लागेल.

Movie Review : सत्य शोधार्थ रचलेलं रोमांचक सूडचक्र
SHARES

'कहानी' आणि 'कहानी २' या थ्रीलरपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक सुजॅाय घोष यांचा हा सिनेमा रोमांचक अनुभव देणारा आहे. हा ओरिजनल हिंदी सिनेमा नसला तरी इतर भाषांमधील सिनेमांचं रिमेक करण्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. हा सिनेमा 'दि इनव्हिझीबल गेस्ट' या स्पॅनिश सिनेमाचा हिंदी रिमेक असला, तरी रूपांतरण केल्याची जाणीव कुठेही होत नाही. हेच या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानावं लागेल.


खुर्चीत खिळवणा थ्रीलरपट

सिनेमाच्या शीर्षकावरून ही एक सूडकथा असल्याची जाणीव होते. सिनेमाचं कथानकही शीर्षकाला अनुसरून असलं तरी यात हत्येचा बदला हत्या असा मुळीच नाही. हा एक वैचारिक बदला आहे. सत्याचा शोध घेण्यासाठी रचलेलं हे एक सूडचक्र आहे. आरोपी स्वत:च कसा या चक्रव्यूहात अडकत जातो याचं रोमांचक चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. लेखक-दिग्दर्शकाच्या मेहनतीला कलाकारांची अप्रतिम साथ लाभल्यानं अखेरपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणारा  समाधान लाभतं. थ्रीलरपट पाहिल्याचं


सिनेमाची सुरूवात

अमिताभ बच्चन यांनी साकारलेले वकील बादल गुप्ता दारावरची बेल वाजवतात आणि सिनेमा सुरू होतो. बिझनेस टायकून नैना सूरी (तापसी पन्नू) दरवाजा उघडते आणि वेळेच्या खूपच लवकर आलेल्या गुप्तांना आत घेते. नैनावर हत्येचा आरोप असतो. त्यातून तिला मुक्त करण्यासाठी गुप्ता तिची केस हाती घेतात. आपल्याकडं केवळ तीन तास शिल्लक असल्यानं या वेळेत तुम्ही घडलेलं सारं खरं खरं सांगितलं तर मी तुम्हाला वाचवू शकतो असं गुप्ता सांगतात. त्यानुसार नैना घडलेला प्रकार सांगू लागते. नैनाचं अर्जुन (टोनी ल्युक) नावाच्या फोटोग्राफरशी अफेयर असतं.

याच अर्जुनच्या हत्येचा आरोप नैनावर असतो. त्यातून नैनाला मुक्त करण्यासाठी तिचा वकील जिमी (मानव कौल) गुप्तांना बोलावतो. नैनाला यातून सहिसलामत बाहेर काढण्यासाठी गुप्तांच्या दृष्टिकोनातून सत्य जाणून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळंच ते तिला घडलेल्या बारीकसारीक गोष्टी सांगायला सांगतात. अत्यंत हुशार आणि चलाख असलेली नैना कित्येकदा गुप्तांनाही गुंगारा देण्याचा प्रयत्न करते, पण अखेरीस तिला सत्य सांगावंच लागतं. सत्य समोर आल्यावर जे चित्र समोर येतं ते आश्चर्यचकित करणारं ठरतं.


सुरुवातीपासूनच क्लूज

एखाद्या थ्रीलरपटासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या सिनेमात आहेत. हत्या, आरोपी, सत्याचा शोध, सूडाचं ठोस कारण, एक सत्य लपवण्यासाठी बोललं गेलेलं असत्य, पाठलाग, ब्लॅकमेलिंग, अपघात... हे सारं यात आहे, पण त्याची मांडणी खूप वेगळ्या पद्धतीनं केल्यानं सिनेमा पाहताना उत्कंठा वाढते. थ्रीलरपटाला साजेसं संगीत, छायांकन, संकलन, मेकअप, कॅास्च्युम, लोकेशन्स या गोष्टीही चांगल्या आहेत. सिनेमा सुरू झाल्यापासून कथा वेगात पुढे सरकते. लेखकानं कथानकात सुरुवातीपासूनच काही क्लूज दिलेले आहेत. सुजाण प्रेक्षकांनी ते लक्षात ठेवून सिनेमा पाहिल्यास क्लायमॅक्समध्ये घडलेल्या गोष्टी उगाच केलेल्या नसल्याचं जाणवेल.


हत्येचा सीन

अमृता सिंग यांनी साकारलेल्या राणीची एंट्री झाल्यावर ती खूप बडबडते असं वाटतं. त्यात ती अॅक्टिंगचा उल्लेख करत केवळ वेळच वाया घालवत असून कथेच्या प्रवाहातही व्यत्यय आणत असल्याचं वाटतं, पण ते सगळं आवश्यकच होतं हे शेवटी समजतं. सत्याचा शोध घेताना हनत्येचा एकच सीन वेगवेगळ्या अँगलमधून दाखवला जाणं रोमांचक ठरतं. वेळेच्या आधी वकीलाचं येणं, प्रॅासिक्युशनकडं साक्षीदार असल्याचं त्याचं सांगणं, तीन तांसांच्या आत सत्य सांगण्याचा आग्रह धरणं, वारंवार खोदून खोदून बारीकसारीक गोष्टी विचारून सत्यापर्यंत पोहोचणं आणि अखेर बेमालूमपणे सत्य वदवून घेणं या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष दिलं तर ही भानगड काहीतरी वेगळीच असल्याचा संशय येतो, पण दिग्दर्शन करताना घोष यांनी कुठेही याची जाणीव होऊ दिलेली नाही.


बेधडक व्यावसायिक स्त्री

तापसी पन्नूनं पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय केला आहे. बेधडक व्यावसायिक स्त्रीची तिनं साकारलेली व्यक्तिरेखा स्मरणात राहणारी आहे. आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहूनही आपली निर्दोष मुक्तता होऊ शकते याचा माज तिच्या चेहऱ्यावर दिसतो. तिनं यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'पिंक' या सिनेमात काम केलं आहे. त्यातही अमिताभ वकीलाच्या भूमिकेत होते, पण इथं परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. या सिनेमात अभिताभ यांची संवादफेक, अभिनय आणि हावभाव पाहण्याजोगे आहेत. एका बंद खोलीत घडणाऱ्या या सिनेमात दोन तगड्या कलाकारांच्या अभिनयाची जणू जुगलबंदीच पाहायला मिळते. अमृता सिंग यांची भूमिका आश्चर्यचकित करणारी आहे. तन्वीर घनी यांचं काम चांगलं झालं असलं तरी दुसऱ्या कलाकाराशी त्यांची सांगड घालताना थोडी गफलत झाल्यासारखी वाटते. मानव कौल, टोनी ल्यूक यांनीही चांगलं काम केलं आहे.

सुजॅाय घोष यांनी सत्याच्या शोधार्थ रचलेलं हे रोमांचक सूडचक्र रिमेकचं उत्तम उदाहरण आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सिनेमा एकदा तरी पाहायला हवा.

दर्जा : ****

...............................................

हिंदी चित्रपट : बदला

निर्माते : गौरी खान, सुनीर खेतरपाल, अक्षय पुरी, गौरव वर्मा

दिग्दर्शक : सुजॅाय घोष

लेखक : सुजॅाय घोष, राज वसंत

कलाकार : अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, अमृता सिंग, तन्वीर घनी, मानव कौल, टोनी ल्यूक



हेही वाचा -

हसीना पारकरच्या घराचा होणार लिलाव

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा