Advertisement

“कुणीतरी येणार येणार गं…”

वार्धक्याच्या उंबरठ्यावरही पुन्हा आई-वडील झालेली बरीच जोडपीही या जगात आहेत. मुलगा उपवर झालेला असताना त्याची आई जर गरोदर राहिली, तर काय होऊ शकतं या वनलाईनवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना अमीत रविंदरनाथ शर्मा यांनी प्रेक्षकांसाठी मनोरंजन आणि हास्याचा जणू खजिनाच खुला केला आहे.

“कुणीतरी येणार येणार गं…”
SHARES

घरी लहानगा नवीन पाहुणा येणार असला कि, केवळ होणाऱ्या बाळाचे आई-वडीलच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबीय आणि नातेवाईकही आनंदी होतात. येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने तयारी करतात. पण हे सर्व ऐन तारुण्यात आई-वडील होणाऱ्या जोडप्याच्या बाबतीतच होतं. मुलं मोठी असलेल्या एखाद्या जोडप्याला जर बाळ होणार असेल, तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. या चित्रपटात अशाच एका जोडप्याची कथा खुमासदार शैलीत पडद्यावर रेखाटण्यात आली आहे.


‘बधाई हो’ या चित्रपटाचा विषय तसा काहींच्या परिचयाचा असला तरी रुपेरी पडद्यावरील प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण आहे. ‘हम दो हमारे दो’ या सरकारी घोषवाक्यानुसार चालणारी बरीच जोडपी आपण सगळीकडे पाहतोच, पण वार्धक्याच्या उंबरठ्यावरही पुन्हा आई-वडील झालेली बरीच जोडपीही या जगात आहेत. मुलगा उपवर झालेला असताना त्याची आई जर गरोदर राहिली, तर काय होऊ शकतं या वनलाईनवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना अमीत रविंदरनाथ शर्मा यांनी प्रेक्षकांसाठी मनोरंजन आणि हास्याचा जणू खजिनाच खुला केला आहे.

एक सुंदर प्रेयसी रेनी शर्मा (सान्या मल्होत्रा) असलेल्या कमावत्या नायकाची म्हणजेच नकुल कौशिकची (आयुष्मान खुराना) ही कथा आहे. नकुलला एक धाकटा भाऊही (शार्दूल राणा) आहे. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या नकुलच्या आईला म्हणजेच प्रियंवदाला (नीना गुप्ता) दिवस जातात. हे ऐकून त्याचे वडीलही (गजराज राव) सुन्न होतात. या वयात मूल होणं वैचारिकदृष्ट्याही ठीक नसून शारीरिकदृष्ट्याही प्रियंवदाला झेपणारं नसल्याने ते तिला गर्भपात करायला सांगतात, पण गर्भपाताचं पातक करायला ती तयार नसते. याउलट येणाऱ्या संकटांना आणि सामाजातून होणाऱ्या टीकेला सामोरं जाण्याचं धाडस ती दाखवते. 



नकुलची आजीही (सुरेखा सिक्री) यावरून प्रियंवदाला खूप बोलते. नवा पाहुणा घरी येण्याची चाहून सुखावणारी असते, पण नकुल आणि त्याच्या भावाच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. मित्रमंडळी, नातेवाईक काय बोलतील या विचारानेच गलितगात्र झालेला नकुल नंतर काय करतो ते या चित्रपटात पाहायला मिळतं.

कथेची मांडणी साधी-सोपी आहे. अतिरीक्त नाट्य किंवा अतिरंजीतपणा करण्याचा मोह लेखक-दिग्दर्शकाने टाळल्याने एक सहजसुंदर कथा या चित्रपटात पाहायला मिळते. एखाद्या कौटुंबिक चित्रपटासाठी आवश्यक असणारी गतीही या चित्रपटाला आहे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना, अर्थपूर्ण संवाद आणि कथेतील प्रसंगांद्वारे विनोदनिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ हसवत नाही, तर काही ठिकाणी भावूकही करतो. 

मुलगा लग्नाचा झाला असलेल्या आपल्या सूनेला मूल होणार असल्याचं समजल्यावर जी सासू खवळते तीच इतर लोक जेव्हा सूनेला बोलतात, तेव्हा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहात त्यांना खडसावते. एकाच व्यक्तिरेखेत सासूचा खट्याळपणा आणि आईच्या मायेचा ओलावा दाखवणारं सुरेखा सिक्री यांचं कॅरेक्टर आजच्या काळातील सासूंसाठी प्रेरणादायी आहे.

या कुटुंबातील प्रत्येकाची एकमेकांशाी वेगवेगळी केमिस्ट्री आहे. या केमिस्ट्रीतील गंमत अनुभवण्यातही एक वेगळी गंमत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश जरी या चित्रपटात दडला असला तरी कुठेही भाषणबाजी नाही. जे सांगायचं ते थेट सांगितलं आहे. परिस्थितीनुरूप गाणीही यात आहेत. वरवर पाहता यात एक प्रेमकहाणी असं वाटेल, पण यात दोन प्रेमकथा आहेत. एक नकुल आणि रेनी यांची आणि दुसरी दिपक आणि प्रियंवदा यांची. 


या चित्रपटाच्या माध्यमातून अनाहुतपणे दिग्दर्शकाने काही प्रश्नही उपस्थित केले असून, त्यांची उत्तरंही अगदी बेमालूमपणे दिली आहेत. हा कौटुंबिक चित्रपट असल्याने आयुष्यमान-सान्या यांचा लिपलॅाक सीन खटकतो. मुलांसोबत हा सीन पाहताना पालकांना अवघडल्यासारखं वाटू शकतं. कॅमेरावर्कपासून कॅास्च्युमपर्यंत आणि संकलनापासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाजू चांगल्या आहेत.

सर्वच कलाकारांनी अफलातून अभिनय केला आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या गजराज राव आणि नीना गुप्ता यांचं विशेष कौतुक करावं लागेल. नीना गुप्ताने ही व्यक्तिरेखा लीलया साकारली असून, गजराज राव यांनी त्यांना सुरेख साथ देत चेहऱ्यावरील मिश्कील हावभाव आणि अभिनय यांचा अचूक ताळमेळ साधला आहे. आयुष्मान खुराना हा जरी या चित्रपटाचा नायक असला तरी नीना आणि गजराजच जास्त भाव खाऊन गेले आहेत. 

आपल्या आईला मूल होणार असल्याचं समजलेल्या लग्नासाठी सज्ज असलेल्या एका तरुणाच्या मनातील भाव आयुष्मानने अतिशय संयतपणे सादर केले आहेत. सान्या मल्होत्राचा ‘दंगल’नंतरचा हा दुसरा चित्रपट. दोन्ही भूमिका अतिशय भिन्न असून तिने तितक्याच विभिन्नपणे त्या साकारल्याही आहेत. सुरेखा सिक्री यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

विषयातील नावीन्य आणि कलाकारांच्या मनमोहक अभिनयाच्या जोडीला या चित्रपटात हास्याची कारंजी फुलवणारे विनोदही आहेत. एका वेगळ्या विषयावरील अतिशय साध्या पद्धतीने मांडणी केलेला हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे.



चित्रपट  : बधाई हो

निर्माता - विनीत जैन, अलेया सेन, हेमंत भंडारी, अमित शर्मा, सुशिल चौधरी, प्रीती साहानी

दिग्दर्शक - अमित रविंदरनाथ शर्मा

कलाकार - आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सिक्री, शीबा चढ्ढा, शार्दूल राणा, राहुल तिवारी



हेही वाचा- 

साक्षी तन्वरच्या घरी चिमुकलीचं आगमन

दिपिका-रणवीर चढणार बोहल्यावर; १४,१५ नोव्हेंबरला रंगणार शाही विवाह सोहळा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा