Advertisement

१५ आॅगस्टच्या रेसमधून 'साहो' बाहेर

यंदाचा स्वातंत्र्य दिन चित्रपट रसिकांसाठी खास ठरणार होता. या दिवशी एक नव्हे, तर तीन मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार होते, परंतु या रेसमधून आता 'साहो' बाहेर पडला आहे.

१५ आॅगस्टच्या रेसमधून 'साहो' बाहेर
SHARES

यंदाचा स्वातंत्र्य दिन चित्रपट रसिकांसाठी खास ठरणार होता. या दिवशी एक नव्हे, तर तीन मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार होते, परंतु या रेसमधून आता 'साहो' बाहेर पडला आहे.


३० आॅगस्टला रिलीज

'साहो'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा चित्रपट १५ आॅगस्ट ऐवजी ३० आॅगस्टला रिलीज होणार आहे. यामागील कारण समजू शकलेलं नाही. यामागं काही तांत्रिक कारण असल्याचं बोललं जात असलं तरी प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण जे झालं ते योग्यच झाल्याचं मत हिंदी चित्रपटसृष्टीतून व्यक्त केलं जात आहे. 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यानं आता १५ आॅगस्ट रोजी 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' हे दोनच हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मराठी रसिकांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीसाठीही दिलासादायक बाब असल्याचं मानलं जात आहे. जर हे तीन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असते तर प्रत्येकाला थोड्या फार प्रमाणात का होईना नुकसान सहन करावं लागलंच असतं, पण आता वेगळं चित्र पहायला मिळणार आहे.


धोक्याचे ढग दूर

जणू १५ आॅगस्टला बॅाक्स आॅफिसवर आलेले धोक्याचे ढग दूर झाले आहेत. त्यामुळं आता ही रेस 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' या दोन चित्रपटांमध्ये रंगेल. जो सरस असेल तो जिंकेलच, पण त्यातल्या त्यात 'मिशन मंगल'ला किंचीत जास्त झुकतं माप मिळण्याची शक्यता चित्रपट व्यवसायतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. प्रभास बाजूला सरल्यानं आता थेट अक्षय कुमार आणि जॅान अब्राहम यांच्या चित्रपटांत सामना रंगणार आहे. एका बाजूला अक्षयच्या साथीला विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, किर्ती कुल्हारी, शरमन जोशी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत, तर दुसऱ्या बाजूला जॅानला जवळजवळ स्वबळावरच चित्रपटाला तारून न्यावं लागणार आहे.


 श्रद्धाचे दोन चित्रपट क्लॅश

'साहो' ३० आॅगस्टला शिफ्ट झाल्यानं आता या चित्रपटासोबत 'मेड इन चायना' आणि 'छिछोरे' हे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. गंमत अशी आहे की, 'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असून, 'छिछोरे'मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबतही तिची जोडी जमली आहे. 'साहो' शिफ्ट झाल्यानं श्रद्धाचे दोन चित्रपट क्लॅश होणार आहेत. 'साहो'बाबत हवा असल्यानं अर्थातच रसिक या चित्रपटालाच अधिक पसंती दर्शवण्याची शक्यता आहे. याशिवाय हिंदी सोबत तेलुगू आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित होण्याचा फायदाही या चित्रपटाला होईल. असं असलं तरी 'छिछोरे' हा चित्रपट 'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केल्यानं या चित्रपटाकडूनही अपेक्षा आहेत. श्रद्धा आणि सुशांतसोबत या चित्रपटात वरुण शर्मा, प्रतीक बब्बर, सिद्धार्थ नारायण, ताहीर राज भसीन अशी तगडी स्टारकास्ट असल्यानं हा चित्रपटही दिग्दर्शन आणि अभिनयाच्या पातळीवर नक्कीच तुल्यबळ ठरणार आहे.


मोठा उलटफेर 

'मेड इन चायना'बाबतही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि मौनी रॅाय ही नवी कोरी जोडी झळकणार आहे. मिखिल मुसळेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान या आजघडीच्या बॅालीवुडमधील आघाडीच्या निर्मात्यांच्या मॅडॅाक फिल्म्स अंतर्गत करण्यात आली आहे. मिखिल मुसळेंबाबत सांगायचं तर त्यांच्या 'राँग साईड राजू' या गुजराती चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला आहे. बोमन ईराणी आणि अमायरा दस्तूरसारखे कलाकारही या कॅामेडी चित्रपटात असल्यामुळं या चित्रपटालाही कमी लेखता कामा नये. हे चित्र पाहता 'साहो' शिफ्ट झाल्यानं आता बॅाक्स आॅफिसवरील १५ आॅगस्टची सर्वच गणितं बदलणार असली तरी ३० आॅगस्टलाही मोठा उलटफेर पहायला मिळणार यात शंका नाही.
हेही वाचा  -

'मोलकरीण बाई'नं मारली सेंच्युरी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा