Advertisement

प्रसिद्ध गायक मोहम्मद अझीज यांचं आकस्मिक निधन

विमानतळावरून घरी परतत असताना अचानक अझीझ यांच्या छातीत दुखू लागल्याने वाहनचालकाने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

प्रसिद्ध गायक मोहम्मद अझीज यांचं आकस्मिक निधन
SHARES

आपल्या मखमली आवाजाने जगभरातील संगीतप्रेमींवर जादू करणारे ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद अझीज (६५) यांचं मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. सोमवारी एका संगीत कार्यक्रमासाठी कोलकाता येथे गेलेले अझीझ मंगळवारी मुंबईत परतले. दुपारनंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावरून घरी परतत असताना अचानक अझीझ यांच्या छातीत दुखू लागल्याने वाहनचालकाने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयातील डाक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मुलगी सनाने अझीझ यांच्या निधनाची बातमी जाहीर केली.


अजरामर गाणी

१९५४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या अझीज यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये हिंदी चित्रपटांसोबत इतर बऱ्याच प्रादेशिक चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केलं आहे. 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत', 'दूध का कर्ज', ‘बंजारन’, ‘आदमी खिलौना है’, ‘लव ८६’, ‘पापी देवता’, ‘जुल्म को जला दूंगा’, ‘पत्थर के इन्सान’, ‘बीवी हो तो ऐसी’, ‘बरसात की रात’ आदी चित्रपटांमधील त्यांची गाणी खूप गाजली. 'प्यार हमारा अमर रहेगा…', 'फूल गुलाब का…', 'दुनिया में कितना गम है…',  'तू कल चला जायेगा…', 'हम तुम्हें इतना…', 'माय नेम इज लखन…',  'ऐ मेरे दोस्त…', 'तेरी बेवफाई का शिकवा…', 'मितवा भूल ना जाना…', 'रब को याद करु…', 'बहुत जताते हो…', 'तुने प्यार की बिन बजाई…', 'तुमसे बना मेरा जीवन…', ‘लाल दुपट्टा मलमल का…’, ‘मैं से मीना से न साकी से…’ यासारखी बरीच हिट गाणी त्यांनी आपल्या जादुई आवाजाने अजरामर केली आहेत.


मोहम्मद रफींचे चाहते

अझीज हे दिवंगत पार्श्वगायक मोहम्मद रफींचे खूप मोठे चाहते होते. संगीतकार अनु मलिक यांनी अझीज यांना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठा ब्रेक देण्याचं काम केलं होतं. अमिताभ बच्चन यांची शीर्षक भूमिका असलेल्या ‘मर्द’ चित्रपटामधील त्यांनी गायलेलं ‘मैं हूं मर्द टांगे वाला…’ या गाण्याने एक वेगळाच इतिहास रचत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता एका पेक्षा एक हिट गीतांचा सिलसिलाच सुरू केला.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा