Advertisement

'ठाकरी' संवादामुळे टाॅलिवूड नाराज

सिद्धार्थने केलेल्या पोस्टनुसार, 'उठाओ लुगी बजाओ पुंगी' हा संवाद दक्षिणात्य जनतेविरोधात आहे. दक्षिण भारतीय जनतेविरोधात द्वेष पसरवणारा आहे. असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला या चित्रपटात ग्लोरिफाय करण्यात आल्यामुळे अशा चित्रपटाला आपण पसंती देणार का? असा सवालही त्याने जनतेला केला आहे.

'ठाकरी' संवादामुळे टाॅलिवूड नाराज
SHARES

'ठाकरे' चित्रपटातील संवादांवर सेन्सॅार बोर्डामागोमाग चित्रपटसृष्टीतूनही नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. 'ठाकरे' चित्रपटातील दक्षिणात्यांविरोधातील संवादावर टाॅलिवूडमधील अभिनेता सिद्धार्थने आक्षेप घेतला आहे.


ट्विटरवरून नाराजी

ट्विटरच्या माध्यमातून सिद्धार्थने 'ठाकरे' चित्रपटातील वादग्रस्त संवादासंबंधातील आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'ठाकरे' चित्रपटाचा हिंदी आणि मराठी भाषेतील ट्रेलर बुधवारी मोठ्या थाटात रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिणात्यांविरोधात छेडलेल्या आंदोलनातील 'उठाओ लुंगी बजाओ पुंगी' या संवादाचा समावेश आहे. सेन्सॅारच्या आदेशावरून या संवादातील 'उठाओ लुंगी' हे शब्द बंद करण्यात आले असून, केवळ 'बजाओ पुंगी' हे शब्द ठेवण्यात आले आहेत. असं असलं तरी त्याचा आशय मात्र कायम राहणारा आहे.


दक्षिणात्य जनतेविरोधात

यावरच सिद्धार्थने आक्षेप घेत आपलं मत व्यक्त केलं आहे. सिद्धार्थने केलेल्या पोस्टनुसार, 'उठाओ लुगी बजाओ पुंगी' हा संवाद दक्षिणात्य जनतेविरोधात आहे. दक्षिण भारतीय जनतेविरोधात द्वेष पसरवणारा आहे. असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला या चित्रपटात ग्लोरिफाय करण्यात आल्यामुळे अशा चित्रपटाला आपण पसंती देणार का? असा सवालही त्याने जनतेला केला आहे. द्वेषाची विक्री करणं थांबवा. हे खूप घातक असल्याचंही सिद्धार्थने लिहिलं आहे. तेलुगू, तमिळ, मल्याळम भाषेतील आघाडीचा अभिनेता असलेल्या सिद्धार्थने 'रंग दे बसंती', 'स्ट्रायकर', 'चश्मे बद्दूर' या हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.


वाद वाढणार?

याउलट ट्रेलर लाँच प्रसंगी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चित्रपटाचे निर्माते व खासदार संजय राऊत यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध 'ठाकरे'ची वाट अडवू शकणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे भविष्यात 'ठाकरे' संबंधातील हा वाद उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत जाणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या काही गाजलेल्या भाषणांचा आणि त्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्यांचाही समावेष आहे. यासोबतच बाबरी मशिदीसारखं गंभीर प्रकरणही या चित्रपटात हाताळण्यात आलं आहे. हे सर्व पाहता चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत 'ठाकरे' चित्रपटाला फार मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार असल्याचं चित्र दिसतं.



हेही वाचा-

'ठाकरे'ची वाट कुणीही अडवू शकत नाही- संजय राऊत

'ठाकरे' जुमानणार का सेन्सॅारचा आदेश?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा