Advertisement

दुर्दैवी, अफवा खरी ठरली! ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन

कादर खान यांचा मुलगा सरफराजखान यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. पीटीआयला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कादरखान दुपारी कोमात गेले होते आणि सोमवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दुर्दैवी, अफवा खरी ठरली! ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन
SHARES

हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं दिर्घ आजारानंतर कॅनडातील रुग्णालयात निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते आपल्या मुलासोबत काही वर्षांपासून कॅनडातच रहात होते. कादर खान यांनी २०१५ मधील 'दिमाग का दही' या सिनेमात शेवटचं काम केलं होतं. एक दिवसआधीच त्यांच्या निधनाची अफवा देशभर पसरली होती. दुदैवाने ही अफवा खरी ठरली.


सोमवारी झालं निधन

कादर खान यांचा मुलगा सरफराजखान यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. पीटीआयला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कादरखान दुपारी कोमात गेले होते आणि सोमवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते १६ ते १७ आठवड्यांपासून रुग्णालयातच होते. त्यांचा अंतिम संस्कार देखील कॅनडातच करण्यात येणार आहे. 


काबूलमध्ये जन्म

कादर खान (Kader Khan) यांचा जन्म २२ आॅक्टोबर १९३७ रोजी अफगाणिस्तानातील काबूल शहरात झाला होता. इंडो-कॅनेडियन वंशाचे कादर खान यांनी राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्या दाग सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. तर त्या आधी 'जवानी दिवानी' या सिनेमासाठी संवाद लिहिले होते. अभिनेते म्हणून त्यांनी तब्बल ३०० हून सिनेमांमध्ये काम केलं, तर २५० हून अधिक सिनेमांमध्ये पटकथा, संवाद लेखन केलं होतं. १९७०-८० च्या दशकात ते प्रसिद्ध संवाद लेखक म्हणून नावारुपाला आले होते. 


हरहुन्नरी कलाकार

सिनेसृष्टीत येण्याआधी ते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवत देखील असत. कादर खान यांनी पडद्यावर संवेदनशील भूमिकांसोबत काॅमेडी भूमिका देखील मोठ्या सहजतेने केल्या. गोविंदासोबत त्यांची खास ट्युनिंग होती. गोविंदासोबत असंख्य हिट सिनेमे देणाऱ्या कादर खान यांची ओळख नवीन पिढीला काॅमेडी अभिनेते अशी असली, तरी त्यांनी असंख्य सिनेमांमध्ये खलनायकही तितक्याच ताकदीने रंगवला होता.  


असंख्य हिट सिनेमे

पटकथा लेखक म्हणून त्यांनी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत अनेक हिट सिनेमे लिहिले. मनमोहन देसाई यांच्यासोबत त्यांनी  ‘धर्म वीर’, ‘गंगा जमुना सरस्वती, ‘कुली’ ‘देश प्रेमी’, 'सुहाग' ‘अमर अकबर अँथोनी’ आणि मेहरा यांच्यासोबत ‘ज्वालामुखी’, ‘ शराबी’, ‘लावारिस’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ सारखे सिनेमे लिहिले. खान यांनी ‘कुली नंबर १’, ‘ मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘कर्मा’, ‘सल्तनत’ सारख्या सिनेमांचे संवादही लिहिले हाेते.

बेस्ट काॅमेडी आणि बेस्ट डायलाॅगसाठी फिल्मफेयर अॅवाॅर्ड विजेते कादर खान यांनी राजेश खन्ना, अभिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र यांसारख्या अभिनेत्यांसोबत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.



हेही वाचा-

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची 'अफवाच'

कादर खान यांची प्रकृती नाजूक; कॅनडात उपचार सुरू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा