Advertisement

तरुण उद्योजकांसाठी महापालिका उभारणार ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’


तरुण उद्योजकांसाठी महापालिका उभारणार ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’
SHARES

केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया धोरण’ आणि राज्य सरकारच्या ‘नावीन्यता आणि स्टार्टअप धोरण २०१७’च्या धर्तीवर मुंबई शहराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिका ‘बिझनेस इन्क्युबेशन सेंटर’ची उभारणी करणार आहे. या माध्यमातून तरुण उद्योजकांना सुरुवातीपासून मुलभूत पायाभूत सुविधा आणि योग्य व्यावसायिक वातावरण तयार होईल. जेणेकरून शहराच्या विकासासाठी उपयुक्त व्यवसायाची सुरुवात करण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.


म्हणून पालिकेने घेतला हा निर्णय

मुंबई शहरामध्ये उद्योग आणि व्यवसायाकरता लागणारी संधी, सोयी-सुविधा आणि इतर पोषक वातावरण हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, जे राज्यातील आणि भारतातील इतर कुठल्याही शहरांमध्ये नाही. या परिस्थितीचा प्रभावीपणे उपयोग करून आयआयटी मुंबईसोबत बिझनेस इन्क्युबेशन सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात तसेच देशाच्या इतर शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात नवनवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुंबईचे उद्योग व्यवसायातील स्थान अबाधित ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आणि उद्योग आकर्षित करणे आवश्यक असल्यामुळे हे सेंटर बनवण्यात येत असल्याचे महापालिकेच्या व्यवसाय विकास विभागाने स्पष्ट केले. याबाबतचे सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.


हे कुणासाठी?

या सेंटरसाठी महापालिकेने जागा, मूलभूत पायाभूत सुविधा, आर्थिक मदत, सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या माध्यमातून नावीन्यपूर्ण कल्पनांना उत्तेजना मिळेल आणि नवीन उद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे या माध्यमातून शहराचा आर्थिक विकास तसेच नवीन रोजगार निर्मिती होण्यासही मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


रोजगार संधीची निर्मिती

आयआयटी मुंबई यांचे सोसायटी फॉर इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप ही प्रमुख बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आहेत. मागील १३ वर्षांच्या कालावधीत सोसायटीच्या माध्यमातून शंभरहून अधिक इन्क्युबेशन कंपन्या सुरू झाल्या आहेत. तसेच २५०० व्यक्तींसाठी रोजगार संधीची निर्मिती केलेली आहे. महापालिका आयुक्त हे या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष राहणार आहेत, तर अतिरिक्त अयुक्त हे उपाध्यक्ष राहणार आहेत. तर याशिवाय उपायुक्तांसह १० सदस्य राहणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा