Advertisement

केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय : २९ वस्तूंवरचा जीएसटी हटवला

२९ वस्तूंवरील जीएसटी माफ झाल्याने तसेच ४९ वस्तूंवरील जीएसटीत कपात झाल्याने सर्वसामान्यांना थोडाफार का होईना, पण दिलासा मिळेल असं म्हणत केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे.

केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय : २९ वस्तूंवरचा जीएसटी हटवला
SHARES

केंद्र सरकारने गुरूवारी हस्तकलेच्या २९ वस्तूंवरील जीएसटी माफ केला असून ४९ वस्तुंवरील जीएसटीच्या दरात कपात केली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. जीएसटी माफ करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये वा जीएसटीच्या दरात कपात झालेल्या वस्तूंमध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. असं असलं तरी २९ वस्तूंवरील जीएसटी माफ झाल्याने तसेच ४९ वस्तूंवरील जीएसटीत कपात झाल्याने सर्वसामान्यांना थोडाफार का होईना, पण दिलासा मिळेल असं म्हणत केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे.



सॅनिटरी नॅपकिन्सवरील जीएसटीमध्ये बदल नाही

जीएसटी परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. महत्त्वाचं म्हणजे सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी कमी करावा वा जीएसटी माफ करावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. त्यामुळे जीएसटीच्या गुरूवारच्या बैठकीत सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी माफ होईल वा कमी होईल अशी आशा होती. पण सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी जैसे थे ठेवण्यात आला आणि सर्वांच्याच आशेवर पाणी पडले.


गणेश मूर्तीकारांना होणार फायदा

हस्तकलेच्या २९ वस्तूंवरील जीएसटी माफ करण्यात आल्यानं याचा फायदा मुंबईसह राज्यातील गणेशमूर्तीकारांना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हस्तकलेत गणेशमूर्तींचा समावेश होत असल्यानं आता गणेशमूर्ती स्वस्त होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.


शेतकऱ्यांनाही दिलासा

ज्या वस्तूंवरील जीएसटी दरात कपात झाली आहे, त्यामध्ये शेती अवजारांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी २५ जानेवारीपासून होणार असल्याचं यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा