Advertisement

मुंबईतील ७ महिला ठरल्या "फर्स्ट लेडी"


मुंबईतील ७ महिला ठरल्या "फर्स्ट लेडी"
SHARES

क्रीडा, कला, साहित्य उद्योग, शिक्षण, आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील ११३ कर्तृत्ववान महिलांना “फर्स्ट लेडी” हा सन्मान देऊन केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश असून मुंबईतल्या ७ महिलांचा समावेश आहे.

येत्या २० जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या महिलांना “फर्स्ट लेडी” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


आ. भारती लव्हेकर ठरल्या “फर्स्ट लेडी”

वर्सोवा येथील विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरु करून नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ एप्रिल रोजी वर्सोवा परिसरातील स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन एटीएम आणि डिस्पोजल मशीन योजना आ. लव्हेकर सुरू केली. ही योजना आता 'ती फाउंडेशन' आणि लोकसहभागातून 'ती सॅनेटरी पॅड बँक' नावाने देशभर राबवण्यात येणार आहे.


यांच्याही कर्तृत्वाचा सन्मान

भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाचं सर्वप्रथम नेतृत्व करणाऱ्या मुंबईतील डायना एडलजी यांना महिला क्रिकेटला दिशा दिल्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशातील पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या मुंबई येथील स्नेहा कामत यांचाही या पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.

मुंबई येथील स्वाती परिमल या असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. देशातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाऱ्या मुंबईच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा व अंधांसाठी देशातील पहिली लाईफ स्टाइल मासिक ब्रेल लिपी प्रकाशित करणाऱ्या मुंबई येथील उपासना मकाती आणि डिजिटल आर्ट द्वारे भारतातील महिला योध्याचा परिचय करून देणारी मुंबईची १८ वर्षीय तरुणी तारा आनंद यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा