Advertisement

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याज

महाग कर्ज घेण्यापेक्षा पैसे उभारायचे इतरही मार्ग आहेत. थोडा शांतपणे विचार केल्यास पैशाची व्यवस्था होऊ शकते. कुठल्या मार्गाने पैसे उभारता येतील हे मार्ग आपण जाणून घेऊया.

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याज
SHARES

कुणालाही अचानक पैशाची गरज लागली तर पहिला विचार मनात येतो तो पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेण्याचा. अशावेळी आपली गरज भागवणे याला प्राधान्य असल्याने पर्सनल लोनसाठी किती व्याज द्यावं लागेल याचा विचार केला जात नाही. पर्सनल लोनसाठी काहीही तारण लागत नसल्याने या कर्जाचा व्याजदर अधिक असतो. हे कर्जही तात्काळ मिळत असल्याने आणि तात्काळ गरज भागवायची असल्याने कोणीही व्याजदराचा विचार करत नाही. अधिक व्याजदराने हे कर्ज घेतलं जातं. मात्र, महाग कर्ज घेण्यापेक्षा पैसे उभारायचे इतरही मार्ग आहेत. थोडा शांतपणे विचार केल्यास पैशाची व्यवस्था होऊ शकते. कुठल्या मार्गाने पैसे उभारता येतील हे मार्ग आपण जाणून घेऊया.


पीपीएफ

कोणत्याही व्यक्तीला बँकेत पीपीएफ खातं उघडता येतं. गरज पडल्यावर पीपीएफमधून कर्जही घेता येते. पीपीएफच्या नियमानुसार, ज्या आर्थिक वर्षात पीपीएफ खातं उघडलं आहे त्यानंतर तिसऱ्या आर्थिक वर्षापासून पाचव्या आर्थिक वर्षापर्यंत फॉर्म डी सह पासबुक देऊन कर्जासाठी अर्ज करता येतो. महाग पर्सनल लोनपेक्षा हा पर्याय चांगला आहे.


ईपीएफ

पर्सनल लोनच्या तुलनेत हा पण एक चांगला पर्याय आहे. घर खरेदी करण्यासाठी आणि गृह कर्जाचा ईएमआय देण्यासाठी ईपीएफ खात्यामधील ९० टक्के रक्कम काढता येते. यासाठी तुम्ही ईपीएफओचे ३ वर्ष सदस्य असला पाहिजे. ईपीएफ खात्यातून स्वतःचे, बहीण, भाऊ किंवा मुलीचे शिक्षणस्वतःचे किंवा मुलगा किंवा मुलीचे लग्न, उपचारासाठी, घर खरेदीसाठी किंवा घराचे कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेऊ शकता. हे कर्ज परतफेड करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत असते. कर्जाची परतफेड दर महिन्याला किंवा एकावेळी करू शकता.


सोने तारण कर्ज 

यामध्ये सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज मिळते. गहाण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीवर कर्जाची रक्कम अवलंबून असते. आरबीआयच्या नियमानुसार, दागिण्यांच्या किंमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते. या कर्जासाठी चांगल्या क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नाही. या प्रक्रियेत खूपच कमी पेपर वर्क असते. त्यामुळे ५ मिनिटातही कर्ज मिळू शकते.


 मुदत ठेवी

बँकांतील मुदत ठेवी (फिक्स्ड डिपाॅझिट) वरही कर्जाची सुविधा मिळते. सरकारी बँका, खासगी बँका आणि एनबीएफसी यांच्याकडून मुदत ठेवींवर कर्ज मिळते. मुदत ठेवीमध्ये असलेल्या रकमेच्या ९० टक्के कर्ज मिळू शकते.


प्राॅपर्टी

गृहकर्जावरही कर्ज घेण्याची सुविधा मिळते. याला टाॅप अप कर्ज म्हणतात. समजा, तुम्ही ३० लाख रुपयांचं घर घेतलं तर तुम्हाला बँकेकडून ८० टक्के म्हणजे २४ लाख रुपये कर्ज मिळेल. त्यानंतर काही वर्षात तुमच्या घराची किमत वाढते. जर किंमत ५० लाख रुपयांवर गेली तर तुमची कर्ज घेण्याची पात्रताही वाढते. या घरावर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. जर तुम्ही गृहकर्जाची पूर्ण परतफेड केली तर तुम्हाला ते घर तारण ठेवूनही कर्ज मिळते.


विमा

काही विमा कंपन्या जीवन विमा पाॅलिसीवर कर्ज देतात. जर तुमच्या पाॅलिसीवर कर्जाची सुविधा असेल तर विमा घेतलेल्या कंपनीकडून कर्ज मिळू शकते. मनी बॅक आणि युलिप योजनांवर कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. मात्र, युलिप पाॅलिसी बँकेकडे गहाण ठेवून कर्ज मिळू शकते. बहुतांश बँका जीवन विमा पाॅलिसीवर कर्ज देतात.



हेही वाचा  -

गृहकर्जावरील कर सवलतीचा लाभ घ्यायचाय? मग जाणून घ्या 'ह्या' अटी

व्याजदर घटले तरी लघु बचत योजना आकर्षकच




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा