Advertisement

व्याजदर घटले तरी लघु बचत योजना आकर्षकच

व्याजदर घटले तरी इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत लघु बचत योजनेतील व्याजदर अद्यापही आकर्षकच आहेत. वरिष्ठ नागरिक आणि सुरक्षित योजना निवडणारे गुंतवणूकदार या सरकारी गॅरंटीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत राहतील.

व्याजदर घटले तरी लघु बचत योजना आकर्षकच
SHARES

सरकारने जूनअखेरीस सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी केले आहेत. वरिष्ठ नागरिक आणि सुरक्षित योजना निवडणारे गुंतवणूकदार या सरकारी गॅरंटीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. व्याजदर कपातीनंतरही ते याच योजनांमध्ये गुंतवणूक चालू ठेवतील. याचं कारण म्हणजे, इतर योजनांच्या तुलनेत लघु बचत योजनांमध्ये मिळणारा आकर्षक व्याजदर आणि कर सवलत. व्याजदर घटले तरी इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत लघु बचत योजनेतील व्याजदर अद्यापही आकर्षकच आहेत.


लहान बचत योजनांवरील व्याजदर इतक्याच कालावधीच्या सरकारी बाँडवर मिळणाऱ्या परताव्याशी संबंधीत असतो. पण तसं पाहिलं तर सरकार आपल्या हिशोबानेच हे व्याजदर ठरवते. एप्रिल – जून तिमाहीत १० वर्ष कालावधीच्या सरकारी बाँडवरील परतावा ०.४० टक्क्यांनी घटला आहे. तर रिझर्व्ह बँकेने या कालावधीत रेपो दरात सलग ३ वेळा कपात केली. रेपो दर या तिमाहीत ०.७५ टक्क्यांनी कमी केला. या सर्व कारणांमुळे आणि दरामधील बदलाचा फायदा किंवा तोटा ग्राहकांना देणं आवश्यक झाल्याने सरकारला लघु बचत योजनांवरील व्याजदर घटवावे लागले. मात्र, लहान गुंतवणूकदारांना लक्षात घेऊन सरकारने सरकारी बाँडचा परतावा जेवढा घटला तेवढी मात्र व्याजदरात कपात केली नाही.

व्याजदर कपातीनंतर वरिष्ठ नागरिक बचत योजनांवर ८.६ व्याज मिळणार आहेवरिष्ठ नागरिकांना ५ वर्ष मुदतीच्या इतर योजनांवर यापेक्षा चांगला व्याजदर मिळणार नाही. बचत योजनांवर त्यांना आयकर कायद्याच्या कलम ८० सी नुसार सूटही मिळेल. इतर योजनांमध्ये व्याजाच्या उत्पन्नावर कर आकारला जातो. मात्र, वरिष्ठ नागरिक लघु बचत योजनांमध्ये आयकर कायद्यातील ८० टीटीबीनुसार मिळणाऱ्या कर सुटीचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे त्यांचा कर वाचला जाईल.

व्याजदर घटले तरी सुकन्या समृद्धी योजनाही आकर्षक राहील. या योजनेवर ८.४ टक्के दराने व्याज मिळेल. हा व्याजदर तसा आकर्षकच आहे. या योजनेत २१ वर्ष गुंतवणूक करावी लागते. आपल्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी या योजनेत आई-वडील तरतूद करतात. व्याजदर कपातीनंतर फक्त या दोनच योजना चांगल्या नाहीत तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ) या योजनेतही गुंतवणूक करणं चांगलं राहील. पीपीएफवर आता ७.९ टक्के व्याज मिळेल. पीपीएफमधील गुंतवणूकीवरही कसलाही कर लागत नाही.

वरिष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्घी योजना आणि  पीपीएफ या योजनांमध्ये आयकर कायद्याच्या ८० सी नुसार कर सवलत मिळते. लघु बचत योजनांमध्ये या योजना सर्वाधिक चांगल्या मानल्या जातातराष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) वर सध्या ७.९ टक्के व्याज मिळते. मात्र, या व्याजावर कर आकारला जातो. पण एक दिलासा म्हणजे  राष्ट्रीय बचत पत्रावर मिळणारे व्याज परत गुंतवता येते. या गुंतवणुकीवर ८० सी नुसार कर सवलत मिळते.

कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) आणि पीपीएफ या दोन्हींमध्ये तीन फायदे मिळतात. मूळ गुंतवणूकीवर आणि व्याजावर कर आकारला जात नाही. तसंच पैसे काढल्यास व्याजही आकारले जात नाही, पण सेवानिवृत्त व्यक्तीला पीपीएफमध्ये आणखी एक फायदा मिळतो. सेवानिवृत्त झाल्यावर तुम्ही ईपीएफमध्ये गुंतवणूक कायम ठेवू शकत नाही. जर सेवानिवृत्तीनंतर ईपीएफमधील रक्कम काढली नाही तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागतो. मात्र, पीपीएफमध्ये आयुष्यभर गुंतवणूक करता येते आणि काढताही येते. पीपीएफपासून मिळणारे उत्पन्न संपूर्ण करमुक्त आहे.

गुंतवणूकदारांना मुदत ठेवी आणि मासिक उत्पन्न योजनांमध्ये गुंतवणूक करणं तेवढं फायदेशीर नाही. या योजनांवर व्याजदर फारसे आकर्षक नाहीत. तसंच या दोन योजनांंवर कर सवलतही मिळत नाही. गुंतवणुकदारांना विशेषकरून वरिष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी बँकेत एफडी केल्यास जास्त व्याज मिळू शकते. लघु बचत योजनांचा सध्याचा व्याजदर आकर्षक असल्याने गुंतवणूकदारांकडून या योजनांना आगामी काळातही प्राधान्य मिळेल.Disclaimer: All views expressed in this article are personal and purely as per the author. Mumbai Live holds no opinion on the content of the article and does not promote any particular view or sentiment.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा