Advertisement

नाशिक जिल्हा बँकेला निधी द्या, छगन भुजबळ यांचे पणनमंत्र्यांना पत्र


नाशिक जिल्हा बँकेला निधी द्या, छगन भुजबळ यांचे पणनमंत्र्यांना पत्र
SHARES

'नाशिकमधील शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवणारी 'नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक' सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाल्यामुळे त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावर झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी द्यावा', अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, 'नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक' ही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाते. परंतु ही बँक सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाली आहे. यांचा परिणाम पीक कर्जवाटपावर झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे पीक कर्ज मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी जिल्हा बँक पीक कर्ज पुरवठा करते. मात्र, वसुली रखडण्यासोबतच बँकेला जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने बँकेचे व्यवहार देखील ठप्प झाले आहेत. पुरेसा चलनसाठा नसल्याने बँकेच्या रोखीच्या व्यवहारांवर बंधने आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून आगामी खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार नाही. कर्ज मिळावे यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासनाने जिल्हा बँकेला पीक कर्जासाठी निधी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे.

शासनाने जिल्हा बँकेला निधी उपलब्ध करून दिला तरच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. पीक कर्ज न मिळाल्यास खरीप हंगाम धोक्यात सापडण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडले असून, शेतकरी आत्महत्येचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. 1 जानेवारी 2017 ते 20 मे 2017 दरम्यान जिल्ह्यात 37 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पीक कर्ज मिळणे गरजेचे आहे. तरी, शासनाने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी शेवटी केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा