एकेकाळचे कोट्यधीश झाले बेघर, रेमंडचे विजयपत सिंघानियांची करूण अवस्था

  Mumbai
  एकेकाळचे कोट्यधीश झाले बेघर, रेमंडचे विजयपत सिंघानियांची करूण अवस्था
  मुंबई  -  

  कापड उद्योगातील नामांकित ब्रँड रेमंड लिमिटेडचे मालक आणि देशातील श्रीमंत घराण्यामध्ये समावेश असलेल्या सिंघानिया कुटुंबातील मालमत्तेचा वाद आता न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे.


  भाड्याच्या खोलीत आसरा

  मुंबई मिररच्या वृत्तानुसार, रेमंड कंपनीचे माजी संचालक ७८ वर्षांचे विजयपत सिंघानिया यांची आर्थिक स्थिती इतकी खालावली आहे की त्यांना सध्या दक्षिण मुंबईतील ग्रँड पराडी सोसायटीत एका भाड्याच्या घरात आसरा घ्यावा लागला आहे.

  त्यांचा मुलगा तसेच रेमंड लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर गौतम सिंघानिया त्यांना सांभाळत नसल्यानेच ही अवस्था झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी मलाबार हिल येथील आपल्या कुटुंबाच्या ड्युप्लेक्स घराचा ताबा मागितला आहे.


  कंपनीत मनमानी

  विजयपत यांनी केलेल्या आरोपानुसार गौतम सिंघानिया सध्या रेमंड कंपनीचा कारभार वैयक्तिक जहागिरी असल्याप्रमाणे हाकत आहे. त्याच्याकडून आपल्याला एक रुपयाही मिळत नसल्याने आपल्यावर आर्थिक हालाखित जीवन जगण्याची वेळ आली आहे.


  इमारतीचा पुनर्विकास

  सिंघानिया यांचे वकील दिनयर मेडन यांनी न्यायालयाला सांगितले की, मलाबार हिल येथे १९६० मध्ये सिंघानिया कुटुंबासाठी एक १४ मजली इमारत बांधण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीतील ४ ड्युप्लेक्स घरांचा ताबा रेमंडची उपकंपनी असलेल्या पश्मीना होल्डिंग्जला देण्यात आला.

  २००७ साली कंपनीने या बिल्डिंगचा पुनर्विकास करण्याचे करण्याचे ठरवले. करारानुसार या इमारतीमध्ये विजय सिंघानिया, गौतम सिंघानिया, वीणादेवी (सिंघानिया यांचे दिवंगत बंधू अजयपत सिंघानिया यांची पत्नी) आणि त्यांचे पुत्र अक्षयपत आणि अनंतपत सिंघानिया यांना प्रत्येकी एक-एक ड्युप्लेक्स घर देण्यात येणार होते. यासाठी नऊ हजार प्रति फूट दराने किंमत मोजावी लागणार होती. परंतु कुणालाही या घराचा ताबा मिळू शकलेला नाही.

  या घराचा ताबा मिळवण्यासाठी वीणादेवी आणि अनंत यांनी अगोदरच एक याचिका दाखल केलेली आहे. तर अक्षयपत यांनी स्वतंत्रपणे वेगळी याचिका दाखल केली आहे.


  एकेकाळी १००० कोटींची संपत्ती

  विजयपत सिंघानिया यांच्या नावावर एकेकाळी रेमंड कंपनीचे १००० कोटी रुपयांचे शेअर्स होते. कंपनीचा कारभार मुलगा गौतम सिंघानियाकडे सोपवताना त्यांनी हे सगळे शेअर्सही त्याच्या नावावर केले.

  पण कंपनीचा ताबा मिळताच गौतमने विजयपत सिंघानिया यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. घरासोबतच गौतमने विजयपत यांच्याकडील गाडी आणि ड्रायव्हरही काढून घेतले.  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.