मुंबईतली कानाकोपऱ्यातील माहिती एकत्रित करून ती ‘डिजिटल वर्ल्ड’च्या व्यासपीठावर आणणं या एकमेव उद्देशातून २०१६ मध्ये ‘मुंबई लाइव्ह’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्रत्येक स्टार्टअप सारखं आम्हीही या प्रक्रियेत सुरुवातीला धडपडलो, अंतर्मुख झालो, त्यातून शिकलो, वाढलो अन् अखेर तो दिवस आला; जेव्हा आम्ही ठरवलं की ‘रि-डिझाईन’च्या माध्यमातून पूर्णपणे नवं रूप धारण करण्याची हीच ती योग्य वेळ.! कारण ‘मुंबई लाइव्ह’ तयार झालं होतं व्हर्जन २.० साठी..! ‘मुंबई लाइव्ह’ने भलेही नवा वेष परिधान केला असला, तरी आमच्या 'फिलिंग्ज' मात्र तसूभरही बदललेल्या नाहीत. पूर्णपणे वेगळा ‘अवतार’ घेण्यामागचं नेमकं कारण काय? याकडे जाण्याआधी एक नजर टाकूया ते ‘मुंबई लाइव्ह’चा लोगो आणि ब्रँड विकसित कसा झाला?, यावर.
आमचा पहिला ‘लोगो’ ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकाव धरू शकला नाही. का? कारण आम्ही नेमके कोण आहोत? आम्ही काय करतो? आमचं व्यक्तिमत्त्व, अस्तित्व सांगण्यात तो सपशेल अपयशी ठरला. नवी वेबसाईट आणि अॅप सुरू करण्यासाठी ब्रँडिंगच्या निमित्ताने केलेली हातघाई किती घातकी ठरू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा पहिलावहिला ‘लोगो’. कुठलाही डिझायनर वा डिझाईन प्रोसेसशिवाय सरळसोट ४५ मिनिटांत साकारलेला हा ‘लोगो’ होता.
‘लोगो’ तयार झाल्यावर वेळ होती, ती वेबसाईटचं डिझाईन करण्याची. अर्थातचं तुमचा तर्क बरोबर ठरू शकतो की आम्ही इथंही जो विचार केला होता, जे ठरवलं होतं किंबहुना सांगण्यात आलं होतं, त्यापेक्षा वेगळंच काहीतरी आमच्या पुढ्यात आलं. कारण वेबसाईट तयार करण्यासाठी आम्ही एक ‘टेक टीम’ नेमली होती. या टीमने जे काही करून आमच्या हाती दिलं, ते आहे तसं स्वीकारण्यावाचून आमच्यापुढे पर्याय नव्हता. अन् त्यातूनच जन्म झाला ‘मुंबई लाइव्ह’चा. किमान आमच्यासाठी तरी...
शहराचा चेहरामोहरा दर्शवणारी एक स्थानिक वेबसाईट आणि अॅप म्हणून काही काळातच आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. याच विचारातून आकार घेतला तो डोळ्याचा समावेश असलेल्या ‘पिन’च्या डिझाईनने. या ‘लोगो’तून ‘मुंबई लाइव्ह’ म्हणून आम्ही आणखी ठळकपणे अधोरेखीत झालो. मुंबईतल्या प्रत्येक घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि शहराच्या बाबतीतलं सर्वकाही आमच्या वेबसाईट - अॅपद्वारे युजर्सना पुरवण्यासाठी आम्ही सज्ज झालो.
‘पिन’चं डिझाईन स्थानिक (मुंबई) परिसर केंद्रीत करणारं ठरलं. तर त्यातील डोळ्याची प्रतिमा मुंबईतील जीवनमानावर, त्यातील प्रत्येक घडामोडींवर नजर ठेवणारी म्हणून सिद्ध झाली. सोबतच गडद लाल रंग ‘लोगो’च्या डिझाईनला न्यूजचा फिल देऊ लागला. “युवर राईट टू नो, राईट नाऊ!” ही कडक, दमदार ‘टॅगलाईन’ही ठरवण्यात आली.
या सर्व प्रक्रियेतून आम्ही थोड्याफार प्रमाणात का होईना; पण योग्य नियोजन, विचारांच्या आधारे युजर्सपुढे व्यक्त होऊ लागलो. अर्थात हा देखील आमच्या परिपूर्ततेचं दर्शन घडवणारा ‘लोगो’ नसला, तरी आमच्या वाटचालीत, वाढीत आणि खासकरून युजर्सपुढे प्रतिमा निर्माण करण्यात या ‘लोगो’चा बऱ्यापैकी हातभार लागला.
केवळ बातम्याच नाही, तर त्याहून अधिक काही आम्हाला हवं होतं. कारण अशा 'स्पेस'मध्ये आम्हाला काम करायचं नव्हतं जिथं अ) आधीच मोठे प्लेअर्स दबदबा राखून आहेत, जिथं आम्हीच हरवण्याची शक्यता अधिक आहे. ब) युजर्सला तोच मचकूर, बातम्या वाचायला द्यायच्या नव्हत्या, ज्या त्यांना इतर ठिकाणी सहजपणे वाचायला मिळतील. क) इतरांच्या तुलनेत शक्य तितक्या झटपट बातम्या प्रसिद्ध करणं किंवा केवळ ‘क्लिक्स’ मिळवण्यासाठी खळबळजनक बातम्या पेरणं, यांतून देखील काही साध्य होणारं नव्हतं. त्यामुळे नेमकं कशावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, हे आमच्या ध्यानात आलं. आणि अर्थातच त्या निव्वळ बातम्या नव्हत्या हे तुमच्याही लक्षात येईलच.
पारंपरिक ‘मीडिया हाऊस’ 'या' गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करतात:
तसं पाहायला गेल्यास वरील सर्व गोष्टी आम्ही देखील युजर्सना वाचायला, पाहायला दिल्याने आम्ही देखील टिकेचे धनी ठरतोच. पण यावर नजर टाकल्यानंतरच सर्वसामान्य मुंबईकराला नेमकं काय दिलं पाहिजे? याचीही जाणीव आम्हाला प्रकर्षाने झाली. इथूनच आम्हाला आमच्या विचारांचा धागा खऱ्या अर्थाने गवसला!
‘मुंबई लाइव्ह’ तुम्हाला काय देऊ करतं:
सोप्या शब्दांत सांगायचं म्हणजे शहरातली माणसं, त्यांची या शहराशी जुळलेली नाळ, ऋणानुबंध या सर्वांवर आम्हाला भाष्य करायचं आहे. आणि त्याचभोवती आम्हाला आमच्या ब्रँडचं जाळं देखील विणायचं आहे. एक असा ‘लोगो’ जो शहराचा प्रत्येक घटक अधोरेखीत करेल. जो डिजिटल ब्रँडला सहाय्यभूत ठरणारा मॉर्डन चेहरा असेल. ‘मुंबई’ आणि ‘लाइव्ह’ हे शब्द सार्थकी लावणारा असेल. त्याचबरोबर मुंबईच्या जडणघडणीत योगदान देणारे तुम्ही (You) अर्थात वाचकांना आपलंसं करणारा ठरेल.
यावेळी आम्ही कुठलीही डेडलाईन समोर ठेवली नाही. आम्ही आम्हाला पुरेसा वेळ दिला आणि जे नियोजन केलं, जे ठरवलं त्याच मार्गावर चालण्याचं निश्चित केलं. आमचे क्रिएटिव्ह हेड कुशांग ढोलकीया यांच्या आपण रि-ब्रँडिंग प्रोसेस का सुरू करू नये? या प्रश्नातून हा सारा घाट घातला गेला.
हा प्रश्न केवळ ब्रँडशी एकरूप होण्यासाठीच नव्हे, तर काहीतरी ठोस करण्यासाठी आम्हाला एका विचार प्रक्रियेत बांधण्यास प्रेरित करून गेला. आम्ही झपाटून कामाला लागलो. निव्वळ ‘लोगो’चा विचार करता एखादी अॅड-हॉक मिटिंग किंवा आठवडाभर निरनिराळ्या डिझाईनवर वेळ खर्ची घातल्यानंतर निवडलेला हा ‘लोगो’ नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही यासाठी बराच वेळ घेतला. तरीही आम्ही पूर्ण समाधानी किंवा पूर्ण ठाम आहोत असंही नाही. कारण या जाणीवेतूनच नवं काही करण्याची तुम्हाला सतत प्रेरणा मिळत राहते, याची आम्हाला खात्री आहे.
असंख्य चर्चा-मिटिंग्ज, अगणित परिक्षण, निरिक्षण, चाचण्यांमधून अखेर अंतिम ‘लोगो’ आमच्या हाती आला. जो खऱ्या अर्थाने ‘मुंबई लाइव्ह’ २.० चं प्रतिनिधित्त्व करू शकेल. न्यू एज, डिजिटल, केवळ बातम्या नाही, तर शहर आणि आमच्या वेबसाईटच्या नावाला न्याय देऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो तुम्हाला (you) अर्थात आमच्या युजर्सचा आपल्यात प्राधान्याने सामावून घेऊ शकेल.
‘लोगो’साठी परफेक्ट रंग शोधताना तो ‘क्लासी’ पण ‘नॅचरल’ असेल, ठळकपणे दिसणारा परंतु साचेबद्ध वेबसाईटसाठी जास्त वापर झालेला नसेल, अशा रंगाच्या आम्ही शोधात होतो. त्यासाठी पुन्हा एकदा असंख्य रंगांचे कॉम्बिनेशन्स आम्ही जुळवून बघितले. त्यातून आमचं एकमत झालं ते #19232D या काळ्या रंगावर. या रंगाला निळ्या रंगाची छटा असलेला राखाडी रंग (डार्क ग्रे) असंही संबोधता येईल. पण आमच्यासाठी हा आहे ‘ऑफ ब्लॅक’ रंग. एक मात्र खरं की हा रंग आम्हाला आवडला, तो तुम्हालाही नक्की आवडेल..!
कुठल्याही नव्या कंपनीसाठी त्याच्या लोगोमध्ये नावाचा समावेश करणं हे ब्रँड डेव्हलप करण्याचं प्रभावी माध्यम ठरतं. रि-ब्रँडिंग करताना ही बाब आमच्या लक्षात होतीच. त्यानुसार आम्ही ‘मुंबई लाइव्ह’ नावात बोल्ड कॅपिटल नॉर्वेस्टर इंग्रजी अद्याक्षरांचा वापर केला. नव्या लोगोसह हे नावंही दिसण्यास ‘कूल’ ठरलं. शार्प ‘लोगो’सहित नावात वापरण्यात आलेला फॉन्ट सहज वाचण्याजोगा आहे. सूक्ष्म, गोलाकार कोपरे आणि सॉलिड टाईप डिजिटल क्रिएटिव्ह किंवा बिलबोर्ड म्हणून आकर्षित करणारा आहे.
अखेर आम्ही ‘ऑफ टार्गेट’ म्हणजेच ध्येयापासून भरकटलो तर नाही ना? याची खातरजमा करून घेण्यासाठी पॉल रँड लोगो टेस्ट प्रक्रियेतूनही गेलो. या टेस्टमधील सर्व प्रश्न सब्जेक्टिव्ह अर्थात विषयाशी निगडीत होते, त्यातून आम्हाला जी काही एकत्रित मानांकने मिळाली ती अर्थात आमच्या अपेक्षेहून अधिक चांगली होती.
पेप्सी किंवा नाईकेसारखी लक्षात राहणारी ‘टॅगलाईन’ बनवावी असं काही आमच्या मनात नव्हतं. पण एक मात्र निश्चित होतं की ‘मुंबई लाइव्ह’च्या २.० व्हर्जनमध्ये पूर्णपणे मुंबई आणि मुंबईकरांनाच केंद्रस्थानी ठेवायचं. आणि म्हणूनच साध्या सोप्या शब्दांत ‘मुंबई लाइव्ह’ २.० ‘फॉर यू’ या टॅगलाईनसह आम्ही हा नवीन ‘लोगो’ ‘फॉर यू’ म्हणजे तुम्हाला समर्पित करत आहोत.
मुंबईकरांना प्रकाशझोतात आणणं, मुंबईकरांच्या समस्यांवर लिहिणं, मुंबईकरांच्या सेलिब्रेशन्सचे व्हिडिओ बनवणं, ज्यावर व्यक्त होण्याची गरज आहे, अशा मुंबईतील सर्व घडामोडी अधोरेखीत करणं हीच ‘मुंबई लाइव्ह’ २.० व्हर्जनची विचारधारा आहे.
मागच्या २ वर्षांत आम्ही जे काही काम केलं, त्यापेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण, मुंबईकरांच्या उपयोगाचं काम करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. कारण तुम्ही ज्याप्रमाणे या शहराच्या जडणघडणीचे सहभागीदार आहात, तसंच ‘मुंबई लाइव्ह’च्या जडणघडणीचे देखील आहात...!