Advertisement

मुकेश अंबानींची संपत्ती देशातील ९ राज्यांच्या जीडीपीइतकी

भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा जगातील ३ श्रीमंत लोकांची संपत्ती अधिक आहे.

मुकेश अंबानींची संपत्ती देशातील ९ राज्यांच्या जीडीपीइतकी
SHARES

 भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी गूगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन तसंच बर्कशायर हॅथवेचे वॉरन बफे यांना मागं टाकलं आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानी हे जगातील सर्वाधिक १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आशियातील एकटेच आहेत.

जगातील १० सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी हे एकमेव भारतीयच नाहीत तर आशियातील एकमेव व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे देशातील गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आदी ९ लहान राज्यांच्या जीडीपीइतकी संपत्ती आहे. या ९ राज्यांचा एकूण जीडीपी ५.३१ लाख कोटी रुपये आहे. तर अंबानी यांची मालमत्ता ५.२५ लाख कोटी रुपये आहे. यापूर्वी एप्रिल २०२० मध्ये अंबानी फोर्ब्सच्या यादीमध्ये २१ व्या क्रमांकावर होते.

ही आहेत राज्ये

राज्ये                         जीडीपी

मिझोराम                 १९,४५७ कोटी रु

अरूणाचल प्रदेश       २२,०४५ कोटी 

मणीपूर                   २३,९६८ कोटी

 नागालॅंड                 २४,२८१ कोटी 

सिक्कीम                 २६,७८६ कोटी

त्रिपुरा                      ४६,१३३ कोटी

गोवा                       ७७,१७२ कोटी

जम्मू-काश्मीर         १,३८,४८८ कोटी

हिमाचल प्रदेश         १,५३,१८१ कोटी


जगातील श्रीमंतांच्या यादीत जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण मालमत्ता १८८.२ अब्ज डॉलर्स आहे. तर बिल गेट्स दुसर्‍या क्रमांकावर (११०.७० अब्ज डॉलर्स) असून बर्नाड ऑर्नोल्ट फॅमिली तिसऱ्या स्थानावर (१०८.८ अब्ज डॉलर) आहेत. चौथ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग (९० अब्ज डॉलर्स), स्टीव्ह बाल्मर  पाचव्या क्रमांकावर (७४.५ अब्ज डॉलर), लॅरी एलिसन सहाव्या क्रमांकावर (७३.४ अब्ज डॉलर्स), मुकेश अंबानी सातव्या क्रमांकावर (७०.१० अब्ज डॉलर्स) आहेत. यानंतर वॉरेन बफे, त्यानंतर लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा क्रमांक लागतो.

अंबानींच्या संपत्तीत 5 वर्षात 3.5 पट वाढ

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबर २०१६ मध्ये जिओबरोबर टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला. यापूर्वी मार्च २०१६  मध्ये अंबानी यांची एकूण मालमत्ता १९.३ अब्ज डॉलर्स होती. त्यानंतरच्या वर्षांत अंबानींची संपत्ती ५० अब्ज डॉलर्स (३.८६ लाख कोटी रुपये) वाढली. मार्चपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही दुप्पट वाढ झाली आहे. २३ मार्च रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत ८७५.७२ रुपये होती. तर १० जुलैपर्यंत शेअर्सची किंमत १८८०.२० रुपयांवर गेली. यामुळे मुकेश अंबानी यांची नेटवर्थ लक्षणीय वाढली आहे.  फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, जिओ व्यतिरिक्त अंबानींच्या एकूण संपत्तीत वाढ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल आणि गॅस व्यवसायामुळे झाली आहे. या दोन्ही क्षेत्रांतून कंपनीला वार्षिक ८८ अब्ज डॉलर्स  (६.६८ लाख कोटी रुपये) महसूल मिळतो.

भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा जगातील ३ श्रीमंत लोकांची संपत्ती

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे १८९.२ अब्ज डॉलर्स (१४.१२ लाख कोटी रुपये) ची संपत्ती आहे. दुसर्‍या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स असून त्यांची संपत्ती १११.१ अब्ज डॉलर्स (८.३० लाख कोटी रुपये) आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर लक्झरी वस्तू कंपनी एलव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नार्ड अर्नाल्ट आहेत.

अर्नाल्ट यांची मालमत्ता १०९.३ अब्ज डॉलर्स (८.१६ लाख कोटी रुपये) आहे. जेफ बेझोस, बिल गेट्स आणि बर्नार्ड अर्नाल्ट यांची एकूण मालमत्ता ३०.५८ लाख कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा भारताचा अर्थसंकल्प ३०.४२ लाख कोटी रुपयांचा आहे.

भारतात ११५ अब्जाधीश

फोर्ब्सच्या यादीनुसार, सध्या भारतात ११५ अब्जाधीश आहेत. एप्रिल २०२० पर्यंत देशात अब्जाधीशांची संख्या १०२ होती. म्हणजेच तीन महिन्यांत देशात १३ अब्जाधीश वाढले. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची मालमत्ता ५.२५ लाख कोटी आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या डी-मार्टची मूळ कंपनी एव्हेन्यू सुपरमार्केटचे मालक राधाकृष्ण दमानी यांच्याकडे १.२१ लाख कोटींची संपत्ती आहे. म्हणजेच पहिल्या आणि दुसर्‍या श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत चार लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचा फरक आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा