उद्यमशील उमेदवारांसाठी ‘सलाम लोन्स’

  Khar (East)
  उद्यमशील उमेदवारांसाठी ‘सलाम लोन्स’
  मुंबई  -  

  काही जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खडतर प्रयत्न करतात. कोणत्याही मर्यादांपलिकडे झेप घेण्याची त्यांच्यात धमक असते. मात्र अनेकांच्या जिद्दीआड येतो पैसा. केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर मुंबईतील उद्यमशील व्यक्तींनाही पैशांची चणचण भासते. अशा गरजू उमेदवारांच्या मदतीसाठी टाटा कॅपिटल सरसावले असून त्यांनी ‘सलाम लोन्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे. खाररोडमधील गोळीबार परिसरात नुकताच यासंदर्भातील उपक्रम राबविण्यात आला.

  या उपक्रमाअंतर्गत ‘लोन का हक’ हा संदेश योग्य उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतील धारावी आणि खाररोड परिसरात दोन बूथ उभारण्यात आले आहेत. या व्हिडियो बूथमध्ये पात्र उमेदवारांनी येऊन आपली कथा चित्रित करायची आहे. ज्यांच्याकडे प्रचंड निर्धार आणि धैर्य आहे आणि ज्यांना कर्जाची नितांत आवश्यकता आहे, अशा जवळपास 120 उमेदवारांनी आपली कहाणी या व्हिडियो बूथमध्ये चित्रित केली आहे.

  धारावी येथील नासीर कुरेशी या अंध व्यक्तीच्या पत्नीला कर्करोगाचे निदान झाले आहे. पत्नीच्या उपचारासाठी त्याला कर्जाची तातडीने गरज असून याच कर्जाच्या माध्यमातून त्याला आपला स्वत:च्या छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे, जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकेल. तर गोळीबार येथील शिवकुमार पासी या कारचालकाच्या डाव्या डोळ्याची दृष्टी नाहीशी झाल्यामुळे ते भाजी विकण्याच्या व्यवसायाकडे वळले. पण त्यातून त्यांच्या दैनंदिन गरजाही पूर्ण होत असल्याने त्यांनी आपले स्वत:चे टू-व्हीलर वॉशिंग सेंटर उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

  सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जासाठी पात्र असलेल्या अनेकांनी आपल्या कथा चित्रित केल्या असून त्यापैकी काही निवडक कथा www.doright.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. या संकेतस्थळावर कर्जासाठी पात्र वाटणाऱ्या उमेदवाराच्या कथेला जितके ‘सलाम’ किंवा ‘लाइक’ मिळतील, त्या संख्येवरून टाटा कॅपिटलतर्फे पात्र उमेदवारांना कर्ज वितरित केले जाणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

   © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.