भारतीय बँकांचे ९,५०० कोटी रुपयांहून अधिक कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेला उद्योजक विजय मल्ल्या याच्या युनायटेड ब्रुअरीज होल्डिंग लिमिटेड (यूबीएचएल) कंपनीचे सर्व बँक अकाऊंट शेअर्स आणि म्युच्युअल फंड जप्त (अटॅच) करण्याचे निर्देश भारतीय भांडवली बाजार नियामक प्राधिकरणा(सेबी)ने दिले आहेत.
सेबीने २०१५ मध्ये नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ‘यूबीएचएल’ला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु कंपनीने हा दंड न भरल्याने १५ लाख रुपयांवर १२ टक्के प्रतिवर्ष या आधारे ३.५ लाख रुपये व्याज आणि वसुली खर्च १ हजार रुपये असे एकूण १८.५ लाख रुपये कंपनीवर सद्यस्थितीत थकीत आहेत.
त्यामुळे सेबीने ही रक्कम वसूल करण्यासाठी कंपनीचे खाते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘यूबीएचएल’ला यापुढे कुठल्याही खात्यात पैसे टाकता येणार असले, तरी काढता येणार नाहीत. ही माहिती सेबीच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे.
डिसेंबर २०१६ मधील नोंदीनुसार ‘यूबीएचएल’मध्ये विजय मल्ल्याचे ७.९१ टक्के वैयक्तिक स्टेक्स आहेत. तर बीएसईतील ताज्या नोंदणीनुसार इतर प्रमोटर्सचे कंपनीत ५२.३४ टक्के स्टेक्स आहेत.
सप्टेंबर महिन्यात न्यायालयापुढे हजर न झाल्याबद्दल विजय मल्ल्याच्या नावाने अटक वॅरंट काढण्यात आलं होतं. परंतु त्याला ताब्यात घेतल्यानंतर काही क्षणातच जामीन मिळाल्याने त्याची सुटका झाली.
हेही वाचा-
आता डीआरआय करणार विजय मल्ल्याच्या किंगफिशर हाऊसचा लिलाव