Advertisement

'ह्या' कारणामुळे पीएमसीवर आले निर्बंध

आरबीआयने केलेल्या कारवाईची बातमी पसरताच देशभरातील पीएमसीच्या शाखेबाहेर पैसे काढण्यासाठी खातेधारकांची गर्दी झाली. बँकेवर निर्बंध का घालण्यात आले असा प्रश्न सर्वांना पडला असेल. याची कारणे आता समोर आली आहेत.

'ह्या' कारणामुळे पीएमसीवर आले निर्बंध
SHARES

आर्थिक अनियमितता आढळल्याने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी विविध निर्बंध घातले आहेत. या ६ महिन्यात पीएमसीला कुठल्याही ठेवी स्विकारता येणार नाहीत. तर नवीन कर्जवाटपही करता येणार नाही. याशिवाय बँकेच्या खातेधारकांना अवघे १ हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेवर आरबीआयने केलेल्या कारवाईची बातमी पसरताच देशभरातील पीएमसीच्या शाखेबाहेर पैसे काढण्यासाठी खातेधारकांची गर्दी झाली. बँकेवर निर्बंध का घालण्यात आले असा प्रश्न सर्वांना पडला असेल. याची कारणे आता समोर आली आहेत. 

आरबीआयने बँकेवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे बँकेचा एनपीए. पीएमसीने बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रस्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २५०० कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. या कंपनीकडून कर्जाची परतफेड होत नव्हती. मात्र, बँकेने कर्जवसुली करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. तर ही कंपनीच दिवाळखोरीत गेली आहे. त्यामुळे एचडीआयएलकडून कर्जफेडीची आशाच मावळली होती. कर्ज वसूल होणार नव्हते तरीही बँकेने ते बुडीत कर्ज म्हणून घोषीत करण्यास नकार दिला. त्यानंतर आरबीआयने हस्तक्षेप करत हे कर्ज बुडीत कर्ज असल्याचे जाहीर केले. तब्बल २५०० कोटी रुपयांचे कर्ज बुडीत झाल्याने बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं साहजिकच आहे. ही आर्थिक अनियमतता आढळल्याने अखेर आरबीआयला पीएमसीवर निर्बंध घालावे लागले. 

या प्रमुख कारणाशिवाय अनेक कारणेही या निर्बंधामागे आहेत. पीएमसीच्या व्यवसायात अचानक वाढ झाल्याने बँकेच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या. मागील एका वर्षात बँकेचे खातेधारक घटले आहेत. मात्र तरीही बँकेच्या व्यवसायात वाढ नोंदली गेली आहे. एका वर्षात बँकेच्या खातेधारकांचा आकडा ६६ हजार ४५ वरून ५१ हजार ६०१ वर आला आहे. तर या वर्षात बँकेचा व्यवसाय २० हजार कोटी रुपयांवर गेला आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत बँकेचा व्यवसाय १७ हजार ३६६ कोटी रुपये होता. पुढील एक वर्षात खातेधारकांची संख्या घटूनही बँकेचा व्यवसाय वाढला यामध्ये शंका घेण्यास वाव आहे. खासगी बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी पीएमसीने चुकीच्या पद्धतीने आपला व्यवसाय वाढ दाखवली असल्याची शंका आरबीआयला आहे. पीएमसीवरील निर्बंधामागे ही पण कारणे असल्याचं बोललं जातं. 

पीएमसीच्या एकूण १३० शाखा आहेत. यातील महाराष्ट्रात १०३, कर्नाटकमध्ये १५ आणि गोवा व दिल्लीमध्ये ६सहा -सहा शाखा आहेत. मागील आर्थिक वर्ष संपताना बँकेजवळ ११ हजार ६१७ कोटी रुपये जमा होते. तर बँकेने ८३८३.३३ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं होतं. 



हेही वाचा -

PMC बँकेतून EMI भराल कसा? हे वाचून मिळू शकेल उत्तर...

घाबरू नका, बघा, काय म्हणाले PMC बँकेचे प्रमुख?




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा