PMC बँकेतून EMI भराल कसा? हे वाचून मिळू शकेल उत्तर...

पीएमसी बँकेतील खात्यातून विविध कर्जांचे मासिक हप्ते (EMI) भरणाऱ्या ग्राहकांसमोर तर मोठं संकटंच उभं ठाकलं आहे. अशा ग्राहकांनी घाबरून जायचं कारण नाही. कारण असे काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही कर्जाचे मासिक हप्ते भरू शकाल.

SHARE

आर्थिक व्यवहारांमधील अनियमिततेचा हवाला देत रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI)ने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँके (PMC) वर ६ महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आरबीआयच्या निर्बंधानुसार पीएमसी बँकेला कुठलंही कर्ज देता येणार नाही. तसंच ठेवीही स्वीकारता येणार नाहीत. एवढंच नाही, तर बँकेच्या ग्राहकांना कुठल्याही खात्यातून १ हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये काढता येणार नाहीत. पीएमसी बँकेतील खात्यातून विविध कर्जांचे मासिक हप्ते (EMI) भरणाऱ्या ग्राहकांसमोर तर मोठं संकटंच उभं ठाकलं आहे. अशा ग्राहकांनी घाबरून जायचं कारण नाही. कारण असे काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही कर्जाचे मासिक हप्ते भरू शकाल.  

दुसऱ्या बँकेतून करा ECS -  

पीएमसी बँकेच्या असंख्य ग्राहकांनी विविध कर्जाचे मासिक हप्ते (EMI), म्युच्युअल फंडचे सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) आयुर्विमा योजनेचे हप्ते (premiums) इतर युटीलिटी बिल्स आपल्या पीएमसी बँकेच्या खात्याशी लिंक केलेले असतील. ज्यातून दरमहा किंवा ठराविक महिन्यांनी आॅटोमॅटीक पद्धतीने पैसे कापून जात असतील. पण आता पीएमसी बँकेचं खातंच निष्क्रिय झाल्याने त्यातून EMI कट होणार नाही. तसं होऊ द्यायचं नसल्यास ग्राहकांनी तात्काळ दुसऱ्या बँकेत जाऊन तिथं ECS फॉर्म भरावा आणि दुसऱ्या बँकेतील खात्याला कर्जाचं खातं जोडून घ्यावं.  

कर्ज देणाऱ्या कंपनीला माहिती द्या - 

पीएमसी बँकेतील खातेधारकांचं खातंच निष्क्रिय झाल्याने या खात्यातून आता कुठलेही व्यवहार होऊ शकत नाहीत. त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेकडं जाऊन आपलं बँक खातं बंद पडल्याची माहिती खातेधारकाने द्यावी. जोपर्यंत दुसऱ्या बँकेतलं अकाऊंट लिंक होत नाही, तोपर्यंत तुम्ही इएमआय कापून जाणाऱ्या तारखेआधीच रोख रक्कम नेऊन कर्ज देणाऱ्या कंपनीकडे नेऊन भरावी. नाहीतर तुम्हाला दंडा (पेनल्टी)ची रक्कम भरावी लागू शकते. तसंच कुणलाचेक दिला असेल, तर संबंधित व्यक्ती किंवा बँकेलाही कळवा म्हणजे तुमचा चेक बाऊंस होणार नाही. 

अॅपद्वारे भरा इएमआय - 

बाजारात असे असंख्य अॅप आहेत, ज्याद्वारे तुम्ही कर्जाचा मासिक हप्ता भरू शकता. उदा. पेटीएम, मोबिक्विक अशा अॅपवरील वाॅलेटद्वारे इएमआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाॅलेटचा वापर करून तुम्ही इएमआय भरू शकता. 

बँक सुरू फक्त व्यवहार बंद - 

रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅपरेटीव्ह बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. केवळ अनियमिततेमुळं बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर ६ महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. बँकेने व्यवहारांमधील अनियमितता दूर केल्यास ६ महिन्यांनंतर बँकेचे व्यवहार पूर्ववर होऊ शकतात.

ठेवींचा विमा -  

पीएमसी बँकेकडे सद्यस्थितीत ११,६१७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर बँकेने ८,३८३ कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. बँकेने आपल्या ठेवींचा विमा काढला आहे. बहुतेक सर्वच बँका आपल्यांकडील ठेवींचा डिपाॅझिट इन्श्युरन्स अॅण्ड क्रेडीट गॅरंटी काॅपर्रेशन (DICGC) अंतर्गत विमा काढतात. आपत्कालिक परिस्थितीत बँक बुडालीच तर खातेधारकाला १ लाख रुपये व्याजासह हमखास मिळतील. खात्यातील १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेला मात्र धोका होऊ शकतो.  हेही वाचा-   

घाबरू नका, बघा, काय म्हणाले PMC बँकेचे प्रमुख?

धक्कादायक! PMC बँकेवर आर्थिक निर्बंध, खातेधारकांना एवढीच रक्कम काढता येणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या