Advertisement

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूच्या कामात 'इतकी' खर्चवाढ

तसेच सेतूच्या जुहू व वर्सोवा कनेक्टरला पश्चिम द्रुतगती मार्ग जोडण्याची गरजही समोर आली आहे. यासाठीच सेतूसंदर्भात महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत.

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूच्या कामात 'इतकी' खर्चवाढ
SHARES

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) बांधल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूच्या खर्चात 6788 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

मच्छिमारांच्या मागणीनुसार काही जोडरस्त्यांच्या लांबीत बदल व वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही खर्चवाढ झाली आहे. त्यात प्रत्यक्ष बांधकामखर्चातील वाढ 3900 कोटी रुपये आहे.

पश्चिम द्रुतगती मार्गावरील ताण कमी करण्यासाठी तसेच दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या (mumbai) दिशेने जलद पोहोचण्यासाठी एमएसआरडीसीने या सागरी सेतूचे बांधकाम सुरू केले आहे.

सध्या प्रामुख्याने समुद्रात खांब उभारणीचे काम सुरू आहे. सेतूच्या सध्याच्या मूळ रचनेनुसार जुहू व वर्सोवा या जोडणीच्या ठिकाणी वाहतूककोंडीची शक्यता असल्याने त्यात बदल तसेच वाढ करण्याची मागणी स्थानिक मच्छिमारांनी केली होती.

त्याचवेळी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अलिकडे केलेल्या सेतूच्या प्रत्यक्ष पाहणीतही या सेतूशी जोडणाऱ्या सर्व जंक्शनवर वाहतूककोंडीची शक्यता लक्षात घेऊन मार्गात बदल सुचविले आहेत.

तसेच सेतूच्या जुहू व वर्सोवा कनेक्टरला पश्चिम द्रुतगती मार्ग जोडण्याची गरजही समोर आली आहे. यासाठीच सेतूसंदर्भात महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. त्यातूनच ही खर्चवाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात एमएसआरडीसीने महाराष्ट्र (maharashtra) किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाकडे (MCZMA) अर्ज केला होता. त्यानुसार या सेतूतील पुलांचे दोन भाग हलविण्यात येणार आहेत.

या पुलाच्या एका भागाची लांबी 100 वरून 110 मीटर होणार आहे. जुहू कनेक्टरची लांबी 3.54 किमीवरून 4.45 किमी होणार असून यामुळे पुलासाठी 120 मीटर लांबीचे दोन अतिरिक्त भाग जोडावे लागणार आहेत.

तसेच जुहू कनेक्टरवर समुद्राकडे जाणारे पाणी अडू नये यासाठी खांबांऐवजी केबलआधारित पूलाची उभारणी होणार आहे.

वर्सोवा कनेक्टरची लांबी 2.72 किमीवरून 4.29 किमी होणार आहे. या कनेक्टरवर पश्चिम द्रुतगती मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर अतिरिक्त केबलआधारित पुल उभा करावा लागणार आहे.

याशिवाय सर्व चार पथकर नाक्यांच्या रचनेतही बदल केला जाणार आहे. यातूनच खर्चवाढ होत असल्याचे एमसीझेडएमएकडे एमएसआरडीसीने केलेल्या अर्जात व त्यासंबंधी अलिकडेच झालेल्या सुनावणीत समोर आले आहे.



हेही वाचा

40% गणपती मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट 100 कोटींची इमारत खरेदी करणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा