कुर्ल्यात घर कोसळून सहाजण जखमी

 Kurla
कुर्ल्यात घर कोसळून सहाजण जखमी

कुर्ल्यातील संदेश नगर विभागातील साई दत्त सोसायटीत मंगळवारी सकाळी एक दुमजली घर कोसळले. या दुर्घटनेत घरातील एकूण सहाजण जखमी झाले आहेत. सुनील कदम (50), सीमा कदम (45), राखी कदम (26), जितू कदम (35), सपना कदम (16) तसेच सुशिला कदम (70) अशी जखमींची नावे असून यातील सुशिला कदम यांची प्रकृती चिंताजनक आहे. सुदैवाने या घटनेत घरातील दीड महिन्यांच्या बाळाला कोणतीही इजा झाली नाही.

सुनील कदम यांच्या मालकीचे हे घर असून मागील अनेक वर्षांपासून या घराची डागडुजी न झाल्याने ते कोसळल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. बैल बाजार परिसरातील विमानतळानजीक हा विभाग आहे. त्यामुळे रहिवाशांना येथून हटवण्यासाठी अनेकदा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र रहिवाशांचे पुनर्वसन झालेले नसल्याने त्यांनी येथून जाण्यास नकार दर्शवला आहे.

राहते घर कधीही सोडावे लागू शकते या भितीने रहिवासी जुन्या घरांची दुरूस्ती करत नाहीत. परिणामी विभागातील बहुतांश घरे मोडकळीस आली आहेत. कदम यांचे घर कोसळल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading Comments