मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही रुग्णवाढ लक्षात घेता महापालिकेनं कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, ज्या इमारतीमध्ये कोरोनाच्या जास्त रुग्ण आढळत आहेत. आशा इमारतही महापालिकेनं सील करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, तब्बल ३०५ इमारती महापालिकेनं सील केल्या आहेत.
मुंबईत गेल्या ६ दिवसांत १३ हजार रुग्ण कोरोनाबाधित आहेत. महापालिकेकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण वाढलं असून, शनिवारी ३ हजार ६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेनं मुंबईतील ३०५ इमारती सील केल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मागील सहा दिवसांत राज्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी १३ हजार ९१२ रुग्ण मुंबईतील आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. मुंबईत ७ ऑक्टोबर २०२० रोजी म्हणजे मागच्या वर्षी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. एका दिवसातील ती रुग्णसंख्या होती २ हजार ८४८ इतकी. त्यानंतर पहिल्यांदाच हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे.
वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून कंटेनमेंट झोन तयार केले जात आहे. त्याचबरोबर मॉल्स, सिनेमागृहांसह गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीही चाचण्या करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहे. मागील सहा दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १३ मार्च रोजी मुंबईत ३१ कंटेनमेंट झोन होते. तर २२० इमारती सील करण्यात आल्या होत्या. १८ मार्च रोजी त्यात मोठी वाढ झाली. कंटेनमेंट झोन ३४ झाले असून, ३०५ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
मुंबईत लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून सर्वत्र नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढला आहे. परिणामी, पालिके ने दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मॉलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी करोना प्रतिबंधासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मॉल आणि मॉलमधील चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत असून नियम-निर्बंध धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पालिके च्या विभाग कार्यालयांमार्फत चाचण्या केल्या जाणार आहेत.