सोमवारी रात्री ठाण्यातील मुंब्रा परिसरातील लकी कंपाऊंड येथील 25 वर्ष जुनी इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत वृद्धमहिलेचा मृत्यू झाला आहे. घटना घडताच क्षणी बचाव पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं आहे.
मुंब्रातील लकी कंपाऊंडमधील डी विंग ग्राउंड प्लस तीन मजली इमारत ही 25 वर्ष जुनी असून, तिच्या टेरेसवर अतिरिक्त बांधकाम करण्यात आले होते.
सोमवारी रात्री अचानक टेरेसवरील रूम नंबर 404चा सज्जा खाली कोसळला. त्यावेळी इमारतीच्या बाजूने जात असलेल्या इलमा जेहरा जमाली (26) आणि नाहीद जैनउद्दीन जमाली (62) या दोन महिलांवर मलबा कोसळला. गंभीर जखमी झालेल्या दोघींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
इलमा यांना काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर नाहीद यांना बिलाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्घटनेनंतर सदर इमारत रिकामी करण्यात आली असून नागरिकांनी आपली राहण्याची व्यवस्था नातेवाईंकाकडे केली आहे. दरम्यान या इमारतीला सील करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या घटनेमुळे मुंब्रा परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी विरारमध्ये घडलेला भीषण अपघात, आता मुंब्र्यातील ही दुर्घटना या सलग घटनांमुळे मुंबई व उपनगरांमधील जुन्या, जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.
हेही वाचा