Advertisement

मिठी नदीजवळ राहणाऱ्यांनो सावधान, पात्रात सापडली भली मोठी मगर

धारावीमधील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ मिठी नदीच्या पात्रात दलदलीत ही मगर दिसून आली आहे.

मिठी नदीजवळ राहणाऱ्यांनो सावधान, पात्रात सापडली भली मोठी मगर
SHARES

धारावीमधील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ मिठी नदीच्या पात्रात दलदलीत मंगळवारी पर्यावरणप्रेमींना साधारण तीन-चार फूट लांबीची मगर आढळली. या मगरीची सुटका करण्यासाठी तात्काळ बचाव पथकाला पाचरण करण्यात आले. मात्र, भरतीची वेळ असल्याने मगरीला पकडणे अवघड बनले होते. दरम्यान, महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील कर्मचारी आणि बचाव पथक मगरीची सुटका करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

मिठी नदीच्या किनाऱ्यालगतच्या दलदल भागात मंगळवारी पर्यावरणप्रेमींना एक मगर आढळली. पर्यावरणप्रेमींनी तत्काळ बचाव पथकाला बोलवले. मात्र, भरतीची वेळ असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून पवई तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे तलावातून मगर मिठी नदीत गेल्याची शक्यता आहे, असे मरिन लाइफ ऑफ मुंबईचे सहसंस्थापक प्रदीप पाताडे यांनी सांगितले.

भरतीमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले. मात्र, ओहोटीनंतर मगरीची सुटका करण्यात येईल, असे महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.

पवई तलावात मोठया प्रमाणात मगरींचा अधिवास आहे. आयआयटी, मुंबईलगतचा परिसर, रेनिसंस हॉटेलजवळील भाग, पवई उद्यानातील तलावाला लागून असलेल्या भागात मगरींचे वास्तव्य आढळले आहे.

तसेच तलावातील छोट्या टेकड्यांवर मगरींचे अधूनमधून दर्शन घडते. या मगरींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने जुलै २०२२ मध्ये महानगरपालिकेने पहिल्यांदाच मगरींची गणना केली होती. गणनेनुसार पवई तलावात साधारण १८ प्रौढ मगरी असल्याचे निदर्शनास आले.



हेही वाचा

एसी लोकलमुळे डबेवालेही त्रस्त, वेळेवर टिफिन पोहोचवणे अवघड

डोळ्यांच्या आजाराने मुंबईकर हैराण, काय काळजी घ्याल?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा