Advertisement

लोअर परळमधील २५० पब, रेस्टाॅरंट, बार अनधिकृतच

कमला मिल कंपाऊंडमधील पबला लागलेल्या आगीनंतर येथील बेकायदा बांधकामांवर प्रकाशझोत पडला आहे. या परिसरात तब्बल २०० ते २५० पब, रेस्टाॅरंट, बार असून या सर्व ठिकाणी सुमारे २० ते ३० हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम झाल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे.

लोअर परळमधील २५० पब, रेस्टाॅरंट, बार अनधिकृतच
SHARES

एकेकाळी कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांमुळे दिवसभर गजबजलेला दक्षिण मुंबईतील लोअर परळ हा परिसर आता पब, बार आणि रेस्टाॅरंटमध्ये साजऱ्या होणाऱ्या नाईट लाइफसाठी ओळखला जातो. पण कमला मिल कंपाऊंडमधील पबला लागलेल्या आगीनंतर येथील बेकायदा बांधकामांवर प्रकाशझोत पडला आहे. या परिसरात तब्बल २०० ते २५० पब, रेस्टाॅरंट, बार असून या सर्व ठिकाणी सुमारे २० ते ३० हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम झाल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे.


वापरात बदल

लोअर परळमधील कमला मिल कंपाऊंडसह तोडी कंपाऊंड, मातुल्य मिल कंपाऊंड तसेच रघुवंशी मिल कंपाऊंड आदी परिसरात वापरात बदल करत (चेंज आफ युजर) मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. यामध्ये १५ प्रकरणे आपल्या हाती असून या सर्व बांधकामांमध्ये सरासरी २० हजार ते ३० हजार चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आल्याचा गौप्यस्फोट कोटक यांनी केला.


बांधकाम स्थगितीचे आदेश धाब्यावर

रघुवंशी मिल कंपाऊंडमध्ये सन २०१२ मध्ये कोर्ट कमिश्नर बसवण्याचे आदेश होते. याठिकाणी बांधकाम स्थगितीचे आदेश असूनही या परिसरात पब, हुक्कापार्लर, रेस्टाॅरंट बार आदी सुरु आहे. यामध्ये फुटबॉल टर्फही बांधले आहे. परंतु यामध्ये आग लागली तर एक फायर इंजिनही फिरु शकणार नाही, एवढी चिंचोळी जागा आहे. मग येथील बांधकामांवर महापालिकेचे अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोटक यांनी केला.


सर्वच बांधकामे अनधिकृत

कमला मिलमधील इमारतींमध्ये केलेल्या बांधकामांसंदर्भात विरोधी पक्षनेते म्हणून आपण ऑगस्टमध्ये विभागाकडे तक्रार करून याबाबतची माहिती मागवली होती. परंतु ही माहिती देताना महापालिकेने या सर्वांना परवानगी दिलेली असून त्यांना बांधकामाची ओसीही देण्यात आल्याचे सांगितले, परंतु आपल्या पत्रानंतर एका माहिती अधिकाराच्या कार्यकर्ता यांनी माहिती मागवली. त्याला मात्र, वन अबोव्ह येथील बांधकामात मोकळ्या जागेवर कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी दिली नसल्याचे सांगितले.


खोटी माहिती दिली

तसेच कमला मिलमध्ये कोणत्याही बांधकामांना मोकळ्या जागेत बांधकाम करण्याची परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना खोटी माहिती देऊन आरटीआय करणाऱ्यांना खरी माहिती दिल्याचे दाखले असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिले. त्यामुळे कमला मिलमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड होत असल्याचा आरोप राजा यांनी केला.


परवाना न देण्याची मागणी

कमला मिल कंपाऊंडमध्ये सुमारे ८४ ते ८५ हॉटेल, पब आहेत. पण या हॉटेल, पबमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी वरळीत मोठ्या प्रमाणात वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे यापुढे कुठल्याही हॉटेल, पबला ३९६ अंतर्गत परवाना दिला जावू नये, अशी मागणी आपण मागील एप्रिल महिन्यात महापालिका आयुक्तांकडे केली होती. परंतु नगरसेवकांच्या मागणीला विचारात न घेता अशाप्रकारचे परवाने दिले जात असल्याचा आरोप आशिष चेंबुरकर यांनी केला.



हेही वाचा-

कमला मिल आग: महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांचं निलंबन

मुंबईमधील ५ नामंकित हॉटेल्सना पर्यावरण विभागाची नोटीस, ३० हॉटेल्सची तपासणी सुरु


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा