Advertisement

कचऱ्यापासून मिळावे स्वातंत्र्य, 'एम्स एएलएम'चा पुढाकार


कचऱ्यापासून मिळावे स्वातंत्र्य, 'एम्स एएलएम'चा पुढाकार
SHARES

मुंबई महापालिका क्षेत्रातील 'बी' वॉर्ड परिसरातून भ्रमंती केल्यास एकच गोष्ट प्रामुख्याने दिसून येते, ती म्हणजे प्रचंड गर्दी आणि अस्वच्छता. या अस्वच्छेतून निर्माण होणारी दुर्गंधी आणि रोगराईच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी 'असोसिएशन फॉर इंटिग्रेशन अँड मॅनेजमेंट ऑफ सोसायटी' अर्थात 'एम्स एएलएम'ने स्वातंत्र्यदिनानिमित्त एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राद्वारे परिसरातील रहिवाशांनी मिळून कचऱ्यापासून स्वातंत्र्य मिळविण्याची शपथ घेतली.

महापालिकेच्या 'बी' वॉर्डात नवरोजी हिल, सॅन्डहर्स्ट रोड, डोंगरी, मस्जिद बंदर, जे. जे. रुग्णालयाजवळील परिसराचा समावेश हाेतो. अत्यंत गजबजलेल्या या परिसरात जागोजागी अस्वच्छता दिसून येते. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी 'एम्स एएलएम'च्या पुढाकाराने आणि महापालिकेच्या मदतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने रहिवासी तसेच बी विभागाचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरूळकर उपस्थित होते.



रहिवाशांच्या प्रबोधनाची गरज

या चर्चासत्राच्या आयोजनासंदर्भात 'एम्स एएलएम'चे अध्यक्ष शबीर हुसेन पूजनी म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील अस्वच्छतेत कमालीची वाढ होते. या मागचे कारण म्हणजे रहिवासी वाट्टेल तिथे कचरा, घाण टाकतात. यामुळे महापालिकेने साफसफाईचे कितीही काम केले, तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे रहिवाशांचे प्रबोधन करण्याकरीता आम्ही या चर्चासत्राचे आयोजन केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कचऱ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येक रहिवाशाने प्रयत्न करावा, अशी आमची इच्छा आहे.'

या कार्यक्रमात डोंगरीतील हिरजी अल्लारखीय अँड लालाजी साजन शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेड करून स्थानिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.


महापालिका कर्मचारी पूर्ण निष्ठेने साफसफाईचे काम करत असतात. परंतु परिसरातील रहिवाशांकडून या कर्मचाऱ्यांना म्हणावी तशी साथ मिळत नाही. रहिवाशी जागोजागी कचरा टाकतात. यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरते, रोगराईला चालना मिळते. एवढी साधी बाबही रहिवासी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व लहान मुलांमध्ये बिंबवायला हवे. मुलांच्या हातात नव्हे, तर मनात झाडू अर्थात स्वच्छतेचा विचार आला पाहिजे. पुढच्या पिढीद्वारे स्वच्छतेचे महत्त्व समाजात पसरून, शहर स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करू शकते.
- उदयकुमार शिरूळकर, सहायक आयुक्त, बी विभाग



रोगराईला अस्वच्छताच कारणीभूत

'हेल्प एएलएम'चे अध्यक्ष डॉ. सादिक उटनवाला म्हणाले की, शहरात डेंग्यू, मलेरीयाचा फैलाव होत आहे. त्यामागे अस्वच्छताच कारणीभूत आहे. या अस्वच्छतेवर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे.

यापुढे कुठलीही व्यक्ती परिसरात कचरा टाकताना दिसल्यास आम्ही त्याला तात्काळ तसे करण्यापासून रोखू, असे मत या चर्चासत्रानंतर १४ वर्षीय आसाम शेख या विद्यार्थिनीने व्यक्त केले.

स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होऊनही आजपर्यंत आपण कचऱ्याच्या समस्येवर मात करू शकलेलाे नाही. मुंबईकरांनी मनात आणले, तर 'एम्स एएलएम'च्या सदस्यांप्रमाणे पुढाकार घेऊन कचऱ्यापासून नक्कीच मुक्ती मिळवता येऊ शकेल.



हे देखील वाचा -

चला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा परिसर करू स्वच्छ - एएलएमचा नारा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा