रात्री 3 वाजेपर्यंत चालते महापालिकेत काम!

 BMC
रात्री 3 वाजेपर्यंत चालते महापालिकेत काम!

नियोजन समितीने सुचवलेल्या शिफारशींसह मुंबईचा विकास आराखडा येत्या 31 जुलैला मंजूर केला जाणार असून यामध्ये आपल्या पक्षांच्या सर्व नगरसेवकांच्या शिफारशींचा समावेश केला जावा, यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना रात्र जागावी लागत आहे. दिवस कमी आणि नगरसेवकांकडून येत असलेल्या शिफारशी अधिक असल्यामुळे गटनेत्यांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागत आहे. गटनेत्यांकडून होत असलेल्या या रात्रीच्या दिवसामुळे आता या सर्व गटनेत्यांच्या कर्मचारी वर्गालाही जागरण होऊ लागलं आहेत.


पहाटे तीन वाजेपर्यंत...

महापालिका मुख्यालयात सभागृहनेते यशवंत जाधव हे सुरुवातीपासूनच रात्रीचे दहा ते अकरा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये तळ ठोकून असतात. परंतु विकास आराखडा महापालिका सभागृहात मंजुरीसाठी मांडण्यात आल्यानंतर यशवंत जाधव यांच्या कार्यालयातील उशिरापर्यंतची उपस्थिती वाढू लागली आहे. यशवंत जाधव हे दरदिवशी साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये थांबत असून गेल्या चार दिवसांपासून अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत थांबण्याचा विक्रम त्यांनी रचला आहे.


मुख्यालयात रात्रीचीही गर्दी वाढली

यशवंत जाधव यांनी मागील स्थायी समितीच्या बैठकीत विकास नियोजन विभाग व इमारत प्रस्ताव विभागात संध्याकाळी सहानंतरच विकासक आणि वास्तूशास्त्रज्ञांचा राबता असल्याचा आरोप केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून जाधव यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी ही रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचेही दिसून आले आहे. यशवंत जाधव यांच्यासोबत एक ते दोन स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर आणि सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांचीही हजेरी लागली जात आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांच्या सूचनांचा लेखाजोखा बनवण्याचे काम सुरु असल्याचे या सर्वांचे म्हणणे आहे.


उशिरापर्यंत थांबण्याची नवी प्रथा

सभागृहनेत्यांप्रमाणे भाजपाचे गटनेते मनोज कोटक हेही उशिरापर्यंत थांबून विकास आराखड्यासाठी नगरसेवकांकडून आलेल्या सूचनांचे संकलन करत आहेत. तसेच विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याकडूनही उशिरापर्यंत थांबून काम केले जात आहे. मनोज कोटक आणि रवी राजा यांनी एकच दिवस उशिरापर्यंत थांबून हे काम केले असले, तर यशवंत जाधव यांच्याकडून मात्र उशिरापर्यंत थांबवण्याची नवीन प्रथा पाडली जात असल्यामुळे खुद्द महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच नाराजी व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अर्थसंकल्पाच्या वेळीच उशिरापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून झालेला आहे.हेही वाचा

महापालिकेत नवा पहारेकरी


Loading Comments