पोर्तुगीज चर्चसमोरील हिरवेगार ‘वाहतूक बेट’

Mumbai
पोर्तुगीज चर्चसमोरील हिरवेगार ‘वाहतूक बेट’
पोर्तुगीज चर्चसमोरील हिरवेगार ‘वाहतूक बेट’
पोर्तुगीज चर्चसमोरील हिरवेगार ‘वाहतूक बेट’
पोर्तुगीज चर्चसमोरील हिरवेगार ‘वाहतूक बेट’
पोर्तुगीज चर्चसमोरील हिरवेगार ‘वाहतूक बेट’
See all
मुंबई  -  

दादर पश्चिमेकडील पोर्तुगीज चर्चसमोरचा गोविंद पटवर्धन मार्ग म्हणजे अत्यंत वर्दळीचे ठिकाण. या रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी उभारण्यात आलेले 'वाहतूक बेट' (ट्रॅफिक आयलँड) गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीचे नियोजन करत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचा कानाडोळा यामुळे या चौकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. उडालेला रंग, जागोजागी साचलेला कचरा तसेच रात्रीच्या वेळेस गर्दुल्ले, नशेखोरांचा वावर, यामुळे स्थानिकांना नाहक त्रास सोसावा लागत होता. यावर उपाय म्हणून पोर्तुगीज चर्च परिसरातील रहिवाशांनी पुढाकार घेऊन येथे 'बेला व्ह्यू' नावाने 'अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट' (एएलएम) स्थापन केले आणि या वाहतूक बेटाचे सुशोभिकरण करून त्याचे अक्षरश: रुपडे पालटले.

या 'वाहतूक बेटा'वरील कचरा साफ करण्यासाठी स्थानिकांनी सगळ्यात पहिल्यांदा 2008 साली पुढाकार घेतला होता. परंतु त्याला काही खास यश मिळाले नाही. तरीही हार न मानता हा परिसर सुशोभित करण्यासाठी रहिवासी पुन्हा एकदा एकवटले आणि 10 ऑगस्ट 2009 साली मुंबई महानगरपालिकेच्या 'अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट' (एएलएम) संकल्पनेत सहभागी होऊन 'बेला व्ह्यू' नावाने 'एएलएम' स्थापन केले. या 'एएलएम'च्या माध्यमातून रहिवाशांनी केवळ हा परिसर स्वच्छ केला नाही, तर ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा जमा करण्याची आदर्श पद्धतही सर्वांना समजावून दिली.

एवढ्यावरच न थांबता रहिवाशांनी या 'वाहतूक बेटा'वर निरनिराळ्या जातीची झाडे लावली. या अनोख्या वृक्षारोपणाने एकेकाळी केवळ वाहनांचा धूर, धूळ आणि गोंगाटाने गजबजलेला हा परिसर हिरवागार दिसू लागला. या हिरवळीच्या सानिध्यात बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. आता या 'वाहतूक बेटा'वर अबालवृद्ध मनसोक्त गप्पा मारताना, निवांतपणे बसलेले दिसतात.

यासंदर्भात 'एएलएम' अधिकारी सुभाष पाटील म्हणाले, 'बेला व्ह्यू' 'एएलएम' मध्ये एकूण 28 इमारतींचा समावेश आहे. या इमारतींतून दर महिन्याला जवळपास 8 लाख किलो कचरा महापालिकेकडे जमा होतो. यापैकी 7 लाख 38 हजार किलो कचरा ओला, तर 65 हजार किलो सुका कचरा असतो. या ‘एएलएम’मध्ये अतिशय उत्तम प्रकारे घनकचरा व्यवस्थापन करण्यात येते.

सुरक्षेवरही विशेष लक्ष -

'बेला व्ह्यू' ‘एएलएम’चे कार्य गोविंद पटवर्धन मार्गापुरतंच मर्यादित आहे. या मार्गावरील आतापर्यंत दुर्लक्षित 'वाहतूक बेट' आम्ही सुशोभित तर केलेच. पण त्याचसोबत येथील सुरक्षेकडे विशेष लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यातही आम्हाला यश मिळाले. १८८६ साली ‘इस्टा क्रूझ डो माँटे’ यांनी येथे ‘होली क्रॉस’ उभारले होते. या ऐतिहासिक ठेव्याचे जतनही आम्ही या ‘वाहतूक बेटा’वर केल्याची महत्त्वपूर्ण माहिती 'बेला व्ह्यू' ‘एएलएम’चे अध्यक्ष पीटर नूरोन्हा यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापनासोबतच मुंबईच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याचा दादरच्या 'बेला व्ह्यू' ‘एएलएम’चा आदर्श मुंबईकरांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.