सेल्फीपॉईंट विरोधात प्राणीमित्रांची तक्रार

 Byculla
सेल्फीपॉईंट विरोधात प्राणीमित्रांची तक्रार

भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यानात तरुणांना आकर्षित करण्याकरिता सेल्फी पॉईंट बनवण्यात आले आहेत. मात्र प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या सचिवांनी या विरुद्ध केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. शहरातील एकमेव असलेल्या प्राणी संग्रहालयाचे सेल्फी पॉईंटमध्ये रूपांतर होतंय की काय? अशी भीती या प्राणीमित्रांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या 150 कोटींच्या निधीचा उपयोग फक्त सेल्फी पॉईंट बनवण्यासाठीच केला जात आहे का? जितक्या जलद गतीने सेल्फी पॉईंट बनवण्यात आले तितक्या जलद गतीने प्राण्यांचे रिकामे पिंजरे का नाही बनवण्यात आले? असे अनेक प्रश्न प्राणी मित्रांनी उपस्थित केले आहेत. त्या सोबतच उन्हाळ्यात नागरिकांना थंड आईस्क्रिमची मजा घेता यावी म्हणून प्राणी संग्रहालयाच्या आवारात आईस्क्रिम पार्लर उघडण्यात आलं आहे. लोक आईस्क्रीम खाऊन त्याच्या काड्या आणि प्लास्टिक तेथेच फेकून निघून जातात. ज्यामुळे राणीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरत आहे. एकंदरीतच प्राणिसंग्रहालयाचे सेल्फी पॉईंटमध्ये होणारे रूपांतर आणि प्राणिसंग्रहालायची दुरवस्था पाहून सुनीश कुंजू या प्राणी मित्राने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांना याबाबत तक्रार करणारे पत्रक लिहिले होते. त्याच तक्रारीची नोंद घेत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांनी वीर जिजामाता उद्यानातील प्रशासनाला याबाबत जाब विचारणारे पत्रक पाठवले आहे. उद्यान प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही उत्तर केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पाठवले नसून, लवकरच याचे उत्तर पत्रकाद्वारे आम्ही पाठवू अशी माहिती उद्यान अधिक्षक संजय त्रिपाठी यांनी दिली.

Loading Comments