महापौर निवासस्थानातील कृत्रिम तलाव बंद


SHARE

मुंबईत गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन पार पडावे, यासाठी सन २००७ पासून कृत्रिम तलावांची संकल्पना रावबण्यात आली. मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्यानंतर डॉ. शुभा राऊळ यांनी महापौर निवासस्थानाच्या जागेत कृत्रिम तलाव निर्माण करत गणेशभक्तांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले होते. त्याच महापौर निवासस्थानाच्या जागेतील कृत्रिम तलाव विद्यमान महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांनी बंद केले आहेत. 

मागील दहा वर्षांपासून महापौर निवासस्थानात कृत्रिम तलाव सुरु होते. परंतु सुरक्षेचे कारण पुढे करत महापौरांनी हे कृत्रिम तलाव न बांधण्याची सूचना केल्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाला क्रीडा भवनाच्या जागेत हे कृत्रिम तलाव बनवावे लागले आहेत. महापौर निवासातील कृत्रिम तलावाची जागाच बदलल्यामुळे दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी येणाऱ्या भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसाेय झाली.


यंदाही ३१ कृत्रिम तलाव

मुंबईत गणेशोत्सवात गणरायाच्या मूर्तींचे भक्तीमय वातावरण विसर्जन करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने चौपाटी, तलाव तसेच अन्य ७१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली जाते. याशिवाय पर्यावरणपूरक विसर्जन करता यावे, याकरता ३१ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ३१ कृत्रिम तलावांमधील शिवाजीपार्कमधील महापौर निवासस्थानाच्या जागेतील कृत्रिम तलावाच्या विसर्जन स्थळाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो.


सुरक्षेच्या कारणास्तव बंद

जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महापौर निवासाच्या जागेतील कृत्रिम तलाव हे क्रीडा भवनाच्या जागेत हलवण्यात आले आहे. मात्र, जी-उत्तर विभागात मागील वर्षी ९ कृत्रिम तलाव होते, याही वर्षी तेवढेच आहेत. केवळ महापौर निवासस्थानाच्या जागेतील कृत्रिम तलाव हे महापौरांच्या सूचनेनुसार सुरक्षेच्या कारणास्तव हलवावे लागले, असे त्यांनी सांगितले.


बाळासाहेबांचे स्मारक होण्यापूर्वी…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासाची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी भविष्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारले गेल्यास लोकांची गर्दी होऊ नये, यासाठीच महापौरांनी हे कृत्रिम आतापासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने ते दुसऱ्या जागेत हलविण्याची सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्याचे बिरादार यांनी सांगितले.


कृत्रिम तलावांमध्ये वाढ होईना!

मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची संख्या वाढलेली दिसत असली, तरी त्यामानाने यात वाढ झालेली नाही. जेव्हा २००७मध्ये ही संकल्पना मांडण्यात आली, तेव्हा १७ कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते, त्यानंतर २०१५ पर्यंत ही संख्या २६ एवढी होती. मागील वर्षी यात पाचने वाढ होऊन ती ३१ एवढी झाली. परंतु यावर्षी त्यात वाढ झालेली नाही. यंदाही ३१ एवढीच कृत्रिम तलाव आहेत.


दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावांमधील विसर्जन

सन
घरगुती
सार्वजनिक
एकूण
2015
10,957
39
10,996
2016
13,766
155
13,921
संबंधित विषय
ताज्या बातम्या