दादर इथल्या महात्मा गांधी जलतरण तलावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात अडीच फूट मगरीचे पिल्लू आढळले आहे. महानगरपालिकेच्या या जलतरण तलावाच्या बाजूला खाजगी प्राणी संग्रहालय आहे इथून ही मगर जलतरण तलावात आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान या प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी ताब्यात घेतले पाहिजेत तसेच हे अनधिकृत प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
रोज पहाटे कर्मचाऱ्यांद्वारे तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरु असल्याचेही ते म्हणाले.
तसेच हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
महात्मा गांधी जलतरण तलावात प्राणी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून आणि जुलै या दोन महिन्यांत सलग दोन साप आढळून आले. हे साप जवळच्या परिसरात बांधलेल्या प्राणिसंग्रहालयातील असावेत, असा अंदाज वर्तवण्यात आला. यावेळी देखील ही मगर प्राणीसंग्रहालयातून आल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणानंतर मात्र येथे पोहण्यासाठी आलेल्या सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा