Advertisement

पालिकेचा अजब न्याय! कंत्राटदाराला दिला ४५ लाखांचा बोनस!

नालेसफाईच्या केवळ तीन कंत्राट कामांमध्ये तब्बल ४५ लाखांनी वाढ झाली असून या तिन्ही कंत्राट कामांचा कंत्राटदार एकच आहे. आणि आता याच कंत्राटदाराला परस्पर वांद्रे तलावातील गाळ काढण्याचे काम देऊन वाढीव कामांचा बोनस त्यांना देण्यात आला आहे.

पालिकेचा अजब न्याय! कंत्राटदाराला दिला ४५ लाखांचा बोनस!
SHARES

मुंबईतील नालेसफाईच्या कामांना मागील वर्षी मंजुरी देण्यात आली आहे. नालेसफाईच्या या कंत्राट कामांसाठी दरवर्षीच्या तुलनेत वाढीव दराने आलेल्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतरही पुन्हा कामांमध्ये वाढ दाखवून कंत्राट किंमत वाढवण्यात आली आहे. नालेसफाईच्या केवळ तीन कंत्राट कामांमध्ये तब्बल ४५ लाखांनी वाढ झाली असून या तिन्ही कंत्राट कामांचा कंत्राटदार एकच आहे. आता याच कंत्राटदाराला परस्पर वांद्रे तलावातील गाळ काढण्याचे काम देऊन वाढीव कामांचा बोनस त्यांना देण्यात आला आहे.


तनीष एंटरप्रायजेसला दिलं काम

मुंबईतील एच पूर्व विभागातील मोठ्या नाल्यांतील अर्थात वाकोला नदी आणि खेरवाडी नाल्यातील गाळ काढण्यासाठी तनीषा एंटरप्रायजेस या कंपनीला १ कोटी ०२ लाख ७८ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु, या कंत्राटदाराला वांद्रे तलावातील गाळ काढण्यासाठी भाडेतत्वावर यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्याचे काम सोपवले आहे. यासाठी सुमारे ४५ लाखांचा खर्च आला असून या कंत्राटात सुमारे दहा लाख रुपये वाढीव दाखवून सुधारीत कंत्राट मंजुरीला आणले आहे.


नवी निविदा काढलीच नाही!

याशिवाय याच कंत्राटदाराकडे मोगरा आणि मजास नाला तसेच के-पूर्व मधील मोठ्या नाल्यांचे कंत्राट होते. या दोन्ही कंत्राट कामांमध्ये अनुक्रमे सुमारे १८ आणि १७ लाख रुपयांचा वांद्रे तलावातील गाळ काढण्याचा खर्च जोडून कंत्राटदाराचा वाढीव खर्च भागवण्यात येत आहे. वांद्रे तलावातील गाळ काढण्यासाठी स्वतंत्र निविदा काढून कंत्राट देण्याऐवजी महापालिकेने परस्पर नालेसफाईसाठी नेमणूक केलेल्या कंत्राटदाराला हे काम दिले. परंतु, ही रक्कम अधिक होत असल्याने याच कंत्राटदाराच्या तीन कंत्राट कामांमध्ये ती समाविष्ट करून त्यांच्या वाढीव कामांचे प्रस्ताव आता स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आणले आहेत.


कंत्राटापेक्षा किती वाढले पैसे?

वाकोला नदी
मूळ कंत्राट किंमत - १ कोटी ०२ लाख ७८ हजार ३१६ रुपये
वाढलेली रक्कम - १० लाख ८६ हजार ८९३ रुपये

मोगरा आणि मजास नाला
मूळ कंत्राट किंमत - १ कोटी ७० लाख ६५ हजार ८२८ रुपये
वाढलेली कंत्राट रक्कम - १८ लाख ४ हजार रुपये

के-पूर्वमधील मोठे नाले
मूळ कंत्राट किंमत - १ कोटी ६२ लाख ७० हजार रुपये
वाढलेली कंत्राट रक्कम - १७ लाख २० हजार ७०७



हेही वाचा

दहिसर, पोयसर, वालभट, ओशिवरा नद्यांमध्ये लवकरच नौकाविहार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा