
वांद्रे पश्चिम येथील तलावाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे. मात्र, या तलावाच्या एका बाजूला चालण्यास पदपथच उपलब्ध नसल्यामुळे त्यासाठी पादचारी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे वांद्रे तलावाभोवती जॉगिंगला येणाऱ्यांना बोर्डवॉक करण्याचा अनुभव मिळणार आहे.
वांद्रे तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सध्या महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात तलावातील अंतर्गत बांधकाम आणि लँडस्केपिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात या तलावाच्या ठिकाणी पादचारी पूल बांधणे, कॅन्टिलिवर पदपथ बांधणे, स्वामी विवेकानंद यांचे म्युरल उभारणे, लोखंडी कुंपण आणि प्रवेशद्वार उभारणीचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी सुमारे सात कोटींचे कंत्राट दिले जात असून या कामासाठी एस. व्ही. इनोव्हाबिल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
स्टेशन परिसर, एस. व्ही. रोड आदींच्या दिशेने तलावाच्या आतून चालण्यास पदपथ उपलब्ध आहे. परंतु, तीन बाजूंनी या तलावाला चालण्यास जागा असल्याने जॉगिंगला येणाऱ्यांना ३६० डिग्री अंशांमध्ये फिरता येत नाही. त्यामुळे एका बाजूने पादचारी पुल बांधून तो तिन्ही बाजूच्या पदपथांना जोडला जाणार आहे.
या पादचारी पुलांची मूळ संकल्पना ही प्रसिद्ध वास्तूविशारद पी. के. दास यांनी बनवलेल्या आराखड्यांमध्ये होती. परंतु, पुढे महापालिकेने तलावाच्या भोवती एका बाजूने चालता येत नसल्याने मातीने तलाव बुजवून चालण्यास एक बाजू तयार करण्याचा निर्णय घेतला. याला स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी तीव्र विरोध केला. त्यानंतर पुरातन वास्तू विभागानेही याला परवानगी नाकारली.
त्यामुळे अखेर बोर्डवॉकच्या धर्तीवर पादचारी पुल बांधून तलावाच्या चारही बाजूंनी लोकांना फिरता येईल, अशा प्रकारे काम करण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा
मिठीच्या शुद्धीकरणासाठी अाता रशियन तंत्रज्ञानाचा वापर
