Advertisement

ठाणे जिल्ह्याची पाणीचिंता मिटली, बारवी धरण ओव्हरफ्लो

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण रविवारपासून भरून वाहू लागल्याने ठाणेकरांची पाणीचिंता आता मिटली आहे.

ठाणे जिल्ह्याची पाणीचिंता मिटली, बारवी धरण ओव्हरफ्लो
SHARES

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण रविवारपासून भरून वाहू लागल्याने ठाणेकरांची पाणीचिंता आता मिटली आहे. गेल्या वर्षी ४ ऑगस्टला धरण भरून वाहू लागलं होतं. यंदा धरण भरण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत वाट बघावी लागली आहे. (barvi dam overflow of thane district after heavy rain in august)

बारवी धरणातून एमआयडीसी, स्टेम, केडीएमसी, जीवन प्राधिकरण या प्राधिकरणांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. धरण भरल्यामुळे या शहरांतील पाण्याची चिंता देखील वर्षभरासाठी मिटली आहे. 

बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर असून ७२.५१ मीटर उंचीपर्यंत धरणात पाणी साठल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 'गोडबोले स्वयंचलित गेट'च्या ११ दरवाजांपैकी १, ७, ९ आणि १० या ४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 

हेही वाचा - मुंबईतील पाणी कपात रद्द

आॅगस्ट महिन्यात धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने जून-जुलैचा बॅकलाॅग पावसाने पूर्ण भरून काढला. परिणामी पाणी कपातीला सामोरे जावे लागलेल्या मुंबईकरांसोबतच ठाणेकरांनाही दिलासा मिळाला. रविवारी सकाळपर्यंत धरणात ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने रात्रीपर्यंत धरण ओव्हरफ्लो झालं. धरणात ३४०.७८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 

धरणात जमा झालेल्या १०६ दशलक्ष घनमीटर वाढीव पाणीसाठ्यापैकी एमआयडीसीला ८८, केडीएमसी २३, स्टेम ८ आणि जीवन प्राधिकरणाला १३ एमएलडी वाढीव पाणीसाठा देण्यात आला आहे. 

बारवी धरणाची उंची वाढवण्याचं काम गेल्या वर्षीच पूर्ण झालं आहे. हे काम १९९८ पासून सुरू होतं. परंतु धारणक्षेत्रात बाधित होणारी ७ गावे आणि ५ पाड्यांच्या पुनर्विकास प्रकियेत हे काम रेंगाळलं होतं. अखेर येथील ११०० बाधित कुटुंबाचं पुनर्वसन झाल्यानंतर धरणाच्या उंचीचं काम मार्गी लागलं. यामुुळे धरणात १०६ दशलक्ष घनमीटर जास्त पाणीसाठा करणं शक्य झालं आहे.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा