Advertisement

पावसानं मिटवला मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा प्रश्न

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात आतापर्यंत ९४.९० टक्के जलसाठा जमा झाला आहे.

पावसानं मिटवला मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा प्रश्न
SHARES

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पडत असलेल्या पावसामुळं मुंबइकरांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसानं मुंबईसह तलाव क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात आतापर्यंत ९४.९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. आता तलाव क्षेत्रात फक्त ५ टक्के जलसाठा कमी आहे.

मुंबईला ७ तलावांतून पाणीपुरवठा केला जात असून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मागील अनेक दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळं तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहू लागले आहेत. दरम्यान, यंदा पावसानं जून व जुलै महिन्यात पुरेशी हजेरी न लावल्यानं मुंबईकरांवर पाणी संकट आलं. परिणामी ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली.

मात्र, त्यानंतर तलाव क्षेत्रात मुसळधार पावसाने कृपादृष्टी दाखवल्यामुळं गेल्या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये तलाव भरले आहेत. तसंच, आता वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणं अपेक्षित आहे. सध्या १३ लाख ७३ हजार जलसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच काळात तलावांमध्ये ९६ टक्के जलसाठा होता.

मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाल्यानं मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. त्यानुसार, २१ ऑगस्टपासून मुंबई १० टक्के पाणीकपात लागू राहणार असल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. 



हेही वाचा -

नॉनकोविड रुग्णांसाठी आता सहज उपलब्ध होणार रुग्णवाहिका

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा