Advertisement

बीडीडीवासिय सोमवारी उतरणार रस्त्यावर!


बीडीडीवासिय सोमवारी उतरणार रस्त्यावर!
SHARES

ना. म. जोशी आणि नायगाव येथील बीडीडीवासियांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडली आहे. रखडलेली ही पात्रता निश्चितीची प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून नुकताच एक अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्यानं सर्वे करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून नायगावमधील इमारतीपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.


'सर्वेक्षण होऊ देणार नाही'

नव्या अध्यादेशानंतरही अखिल भारतीय बीडीडी चाळ सर्व संघटना एकत्रित संघानं सर्वेक्षणाला विरोध केला आहे. त्यांच्या मते नव्या अध्यादेशात बायोमेट्रीक सर्वे हा फक्त शब्द वगळत सर्वच जाचक अटी जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सोमवारी होणारं सर्वेक्षण होऊ देणार नाही, असं म्हणत संघाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी सोमवारी बीडीडीवासिय रस्त्यावर उतरतील आणि सर्वेक्षण हाणून पाडतील, असा इशारा म्हाडाला दिला आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.


बायोमेट्रीक सर्वेक्षण रद्द

बीडीडीसाठी पहिल्यांदाच म्हाडानं बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा आधार घेतला होता. पण रहिवाशांनी बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाला विरोध करत हे सर्वेक्षण हाणून पाडलं होतं. तर बायमेट्रीक सर्वेक्षणासह पात्रतेच्या जाचक अटी रद्द करण्याची तसेच आधी भाडेकरार मग सर्वेक्षण अशी मागणी रहिवाशांनी उचलून धरली होती. त्यानुसार राज्य सरकारनं नुकताच पात्रतेसंबंधीचा नवा अध्यादेश जारी करत बायोमेट्रीक सर्वेक्षण रद्द करत नव्या अटी लागू केल्या आहेत.


'पात्रता निश्चिती करा'

वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार फक्त बायोमेट्रीक सर्वेक्षण हा शब्द काढत सरकारनं जाचक अटी जशाच्या तशा ठेवल्या आहेत. तर भाडेकराराचा सरकारला विसर पडला आहे. दुसरीकडं मात्र बीडीडीतला एक गट नव्या अध्यादेशानं समाधानी आहे. नव्या अध्यादेशानुसार कोणीही रहिवासी अपात्र ठरणार नसल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी दिली आहे. तर आपल्या संघटनेचा या सर्वेक्षणाला कुठलाही विरोध नसून उलट हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करत आमची पात्रता निश्चिती करावी, अशी मागणी त्यांनी म्हाडाकडं केली आहे.

एकत्रित संघ मात्र सर्वेक्षणाच्या विरोधात ठाम आहे. त्यामुळेच सोमवारपासून नायगाव येथील इमारत क्रमांक १२ आणि १३ मधील इमारतीच्या सर्व्हेक्षणाला एकत्रित संघाकडून विरोध करण्यात येईल, त्यासाठी संघ आणि रहिवासी सोमवारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतील असंही वाघमारे यांनी सांगितलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा