'मुंबईत कुठेही घर नाही' या अटीवर बीडीडीवासीयांचा आक्षेप

 Naigaon
'मुंबईत कुठेही घर नाही' या अटीवर बीडीडीवासीयांचा आक्षेप

बीडीडी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यातही मुंबईत कुठेही घर नाही यासंबंधीचे हमीपत्र देण्याची अट बीडीडीवासीयांसाठी सर्वात जाचक ठरत आहे. त्यामुळे ही अट त्वरीत रद्द करण्याची मागणी बीडीडीवासीयांसह सर्वच बीडीडीतील संघटनांनी केली आहे. तर ही अट रद्द झाल्याशिवाय बायोमेट्रीक सर्वेक्षण होऊ देणार नाही असे म्हणत प्रकल्पाच्या समर्थकांनीही आता म्हाडा आणि सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

बीडीडीतील संघटनांमध्ये दोन गट असून, एक गट प्रकल्पाच्या बाजूने तर एक प्रकल्पाच्या विरोधात आहे. संमतीच्या अटीचा मुद्दा उचलत विरोधातील संघटनांनी-रहिवाशांनी सुरूवातीपासूनच बायोमेट्रीकला विरोध करत हे सर्वेक्षण पहिल्याच दिवशी हाणून पाडले होते. तर या सर्वेक्षणादरम्यान अनेक महत्त्वाच्या आणि रहिवाशांसाठी मारक अशा बाबी समोर आल्या आहेत. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत कुठेही घर नाही यासंबंधीचे हमी पत्र. मुळात म्हाडाच्या सोडतीतील घराचा लाभ घेण्यासाठी,पंतप्रधान आवास योजनेसह अन्य सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही अट लागू आहे. कुठल्याही पुनर्वसन योजनेसाठी ही अट लागूच होत नाही. असे असताना ही अट म्हाडाने बीडीडीसाठी लागूच कशी केली? असा सवाल अखिल बीडीडी चाळ रहिवाशी महासंघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे. तर ही अट रद्द करण्याची मागणीही उचलून धरली आहे.


हेही वाचा

बीडीडीत बायोमेट्रिक सर्वेक्षण करणारच - प्रकाश मेहता

बीडीडीतील सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ!


या अटीमुळे प्रकल्पाच्या विरोधात असणारेच नव्हे तर प्रकल्पाच्या बाजूने असणारे रहिवाशी आणि संघटनाही हवालदिल झाल्या असून, आता समर्थकांनीही सर्वेक्षणाला विरोध केला आहे. पुनर्वसनासाठी ही अट चुकीची असल्याने ही अट रद्द होत नाही तोपर्यंत सर्वेक्षण होऊ दिले जाणार नाही, असा इशारा बीडीडी चाळ उपक्रम सेवा समितीचे सरचिटणीस कृष्णकांत नलगे यांनी दिला आहे. तर म्हाडाने या अटीसह अन्य जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधीचे शुद्धीपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती आ. कालिदास कोळंबकर यांनी 'मुबई लाइव्ह'ला दिली आहे. हे शुद्धीपत्रक आणि यासंबंधीचा अध्यादेश जारी झाल्यानंतरच बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरूवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्याचा म्हाडाचा दावा तूर्तास फुसका ठरला असून, शुद्धीपत्रक आणि अध्यादेश जारी केल्यानंतरच आता सर्वेक्षण सुरू करणे म्हाडाला शक्य होणार आहे, हे नक्की.

Loading Comments