Advertisement

उद्घाटनापूर्वीच गोरेगावचा पूल, चेंबूरचा स्विमिंगपूल खुला


उद्घाटनापूर्वीच गोरेगावचा पूल, चेंबूरचा स्विमिंगपूल खुला
SHARES

मुंबईतील गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपुलाच्या विस्तारीत पुलाचं बांधकाम आता पूर्ण झालं असून याच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळं शिवसेनेनं पुलाचं उद्घाटन न करता तो लोकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबरच चेंबूरमधील जनरल अरूणकुमार वैद्य जलतरण तलावाचंही (स्विमिंगपूल) उद्घाटन पुढे ढकलत हा तलाव शनिवारपासून खुला करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

भाजपाकडून श्रेयाचा प्रयत्न

गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाणपुलाचे विस्तारीत कामाचं श्रेय मंत्री विद्या ठाकूर आणि भाजपा नगरसेवक दिपक ठाकूर घेण्याचा प्रयत्न करत अाहेत. विद्या ठाकूर यांच्यासह भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी या पुलाची पाहणी करून पूल खुला करण्याची मागणी केली होती. परंतू या पुलाच्या उद्घाटनाची तारीख महापौरांकडून निश्चित केली जात नव्हती.


शुक्रवारुपासून पूल सुरू

एकूण ४६० मीटर लांबीच्या आणि १०.५ मीटर रुंदीच्या या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं असून या पुलावर तीन मार्गिका बनवण्यात आल्या आहेत. यातील एका मार्गिकेचा वापर हा आवश्यकतेनुसार येण्या - जाण्यासाठी केला जाणार आहे. २६ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या पुलाचं उद्घाटन शुक्रवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केलं जाणार होतं. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन पुढे ढकलून पूल लोकांसाठी खुलं करून देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पुल शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून खुलं करून देण्यात येईल, अशी घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.


वाहतूक कोंडीतून सुटका

हा पुल खुला झाल्यास एस.व्ही.रोड आणि लिंकींग रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पहिले १५ दिवस या पुलावरील वाहतूकीचा अभ्यास करून त्याप्रमाणे वाहतुकीसाठी तो खुलं करून दिलं जाणार असल्याचं पुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.


तरणतलावही होणार खुला

चेंबुरचा जनरल अरूणकुमार वैद्य जलतरण तलाव मागील अनेक वर्षांपासून बंद असून त्यांच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालं आहे. येत्या शनिवारी या स्विमिंगपुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केलं जाणार होतं. या उद्घाटनावरून भाजपा आणि शिवसेनेमध्येही श्रेयवादावरून चांगलीच जुंपलीच आहे. त्यामुळे या उद्घाटनात दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता होती. परंतु तत्पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीचं कारण देत शिवसेनेनं हा कार्यक्रम पुढे ढकलत शनिवारपासून हे स्विमिंग पुल लोकांसाठी खुलं करून देण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

महापालिका मुख्यालयातील स्लॅबचा भाग कोसळला, कर्मचारी थोडक्यात बचावला

विस्तारीत राणीबागेच्या भूखंडाची याचिका रद्द; मफतलाल कंपनीला दणका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा