Advertisement

मुंबईकरांची ‘बेस्ट’ फसवणूक?


मुंबईकरांची ‘बेस्ट’ फसवणूक?
SHARES

मुंबई - मुंबईकरांचा बेस्ट प्रवास बेस्ट व्हावा याकरता बेस्ट प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करत टाटाकडून 303 नवीन बसगाड्या खरेदी केल्या. या बसगाड्यांमधील पहिली नमुना बसगाडी 8 डिसेंबर 2016 मध्ये बेस्टच्या ताफ्यात येणार होती. मात्र आता ही डेडलाइन उलटून 25 दिवस झाले तरी नमुना बसगाडीचा पत्ता नाही. नमुना बसगाडी आल्यानंतर पुढील तीन महिन्यात उर्वरित 302 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात येणार होत्या. पण आता पहिली नमुना बसच न आल्याने पुढच्या गाड्यांनाही विलंब होणार आहे. निवडणुकीनंतरच आता या बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासन गाड्या आणण्यासाठी पाठपुरावा करत नसल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्य रवी राजा (काँग्रेस) यांनी मंगळवारी 3 जानेवारीला झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्यावर बोलताना केला आहे. बसगाड्यांची संख्या कमी असल्याने एकीकडे बेस्टला दिवसाला दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांनाही त्याचा फटका बसत आहे. बसगाड्या खरेदी केवळ कागदावरच दाखवत बेस्ट मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचेही रवी राजा यांनी म्हटलं.
बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी टाटा मोटर्सला 303 बसगाड्यांच्या खरेदीसाठी ऑर्डर दिली असून गाड्या येण्यास एक महिना विलंब झाल्याचे या वेळी मान्य केले आहे. मात्र बसगाड्या आणण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत पाटील यांनी मार्चअखेरीपर्यंत 100 बसगाड्या पुरवण्याचे टाटा मोटर्सला आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन बसगाड्यांमधून प्रवास करण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. दरम्यान टाटाने आणखी विलंब केला तर त्यांच्याविरोधात अटी भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा